प्रतिनिधी /काणकोण
काणकोण मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीत नव्या चेहऱयाची मागणी वाढायला लागली असून काणकोणातील भाजपाचे कट्टर समर्थक असलेले श्रीस्थळचे माजी सरपंच देवेंद्र नाईक हे आपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळाली आहे. या मतदारसंघात भाजपाच्या तसेच काँग्रेसच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच चालू आहे. गोवा फॉरवर्डचे प्रशांत नाईक कामाला लागले आहेत. देवेंद्र नाईक यांचा या मतदारसंघात दांडगा संपर्क आहे. त्याचा लाभ आम आदमी पक्षाने उठविण्याचे ठरविले असल्याची माहिती मिळाली आहे. आम आदमी पक्षाचे सध्या 15 पेक्षा अधिक कार्यकर्ते या मतदारसंघात फिरून कानोसा घ्यायला लागले आहेत. त्यामुळे येणाऱया काळात बऱयाच घडामोडी घडण्याचे संकेत मिळायला लागले आहेत.