बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेस सुरुवात
धनंजय गोरे/ आनेवाडी
देशसेवेसाठी स्वतःचे आयुष्य खर्ची करणाऱया भारतीय संरक्षण दलातील सर्व माजी सैनिक तसेच सैनिक विधवा पत्नी यांना त्यांच्या मिळकतीमधील मालमत्ता करातुन बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेच्या माध्यमातून सूट मिळणार असून तसा शासन निर्णय 2020 साली घेतला आहे. ग्रामविकास व नगरविकास विभागाच्या वतीने याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
ग्रामीण व शहरी भागात वास्तव्य असणाऱया संरक्षण दलातील माजी सैनिक व सैनिकाच्या विधवा वीरपत्नी यांचे नावे असणाऱया घराच्या घरपट्टीमध्ये सरकारच्या या निर्णयाने सूट मिळत असून यासाठी सदर माजी सैनिक यांनी पुढील कागदपत्रांची पूर्तता करावी. यामध्ये महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला, जिल्हा सैनिक कल्याण बोर्डातील अधिकारी यांच्याकडील माजी सैनिक तसेच संरक्षक दलात सेवा केल्याबाबतचे पत्र, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचे नावे मालमत्ता सूट मिळण्याबाबत घोषणापत्र, सोबत ही सवलत अविवाहित शहीद झालेल्या सैनिकाच्या आई वडील यांना देखील मिळणार असून या योजनेच्या करीता राज्य सरकारकडून निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
बाळासाहेब ठाकरे सन्मान योजनेचा लाभ राज्यातील सर्व माजी सैनिक व शहीद जवानांच्या कुटुंबियाना मिळावा या करीता जयहिंद फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न सुरु होते. काही ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीमध्ये या योजनेबाबत चाल ढकल केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने जयहिंद फाउंडेशनने याबाबत आवाज उठविल्याने आता ग्रामीण भागात याचा सर्व कागदपत्रे याची पूर्तता केल्यास सूट मिळत आहे. या योजेनचा सर्व माजी सैनिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जयहिंद फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.