प्रकृतीत सुधारणा, दोन दिवसांत डिस्चार्ज मिळणार
वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारताचे माजी क्रिकेटपटू बी.एस. चंद्रशेखर यांना पक्षाघाताचा अतिसौम्य झटका आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे आणि दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.
75 वर्षीय चंद्रशेखर हे माजी महान लेगस्पिनर असून शुक्रवारी संध्याकाळी त्यांना थकवा जाणवत होता तसेच बोलताना त्यांची जीभही अडखळत होती. त्यांना अतिशय सौम्य पक्षाघाताचा धक्का बसल्याचे वाटल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, असे त्यांच्या पत्नी संध्या चंद्रशेखर यांनी सांगितले. ‘त्यांची प्रकृती झपाटय़ाने सुधारत असून बुधवारी किंवा गुरुवारी त्यांना घरी सोडण्यात येणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चंद्रशेखर यांना ऍस्टर आरव्ही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि तेथे त्यांना अतिदक्षता विभागात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. ‘त्यांना आता नियमित वॉर्डमध्ये हलविण्यात आले असून ते फिजिओथेरपी घेत आहेत. त्यांच्या मेंदूमध्ये हलकेसे ब्लॉकेज निर्माण झाले असून औषधोपचाराने ते एक-दोन आठवडय़ात त्यातून पूर्णपणे बरे होतील. सध्या त्यांना कोणतीही समस्या नाही. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोणताही धोका नसल्याचे त्यांच्या चाहत्यांना सांगावे. ते जबरदस्त इच्छाशक्ती असणारे व्यक्ती आहेत,’ असे संध्या यांनी सांगितले.
16 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत चंद्रशेखर यांनी 58 कसोटीत 242 बळी मिळविले. चंद्रशेखर, बेदी, ईरापल्ली प्रसन्ना व एस. वेंकटराघवन ही 60 व 70 च्या दशकातील जगप्रसिद्ध फिरकी चौकडी बनली होती. चंद्रा यांना अर्जुन पुरस्काराने तसेच 1972 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.