वृत्तसंस्था/ चंदीगड
भारताचे माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू बलबीर सिंग ज्युनियर यांचे मंगळवारी वयाच्या 88 व्या वर्षी वृद्धापकालाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहीत कन्या आणि एक मुलगा असा परिवार आहे.
1958 साली आशियाई क्रीडास्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱया भारतीय हॉकी संघामध्ये बलबिर सिंग ज्युनियर यांचा समावेश होता. जालंधरमध्ये 1932 साली त्यांचा जन्म झाला. आपल्या हॉकी कारकीर्दीमध्ये त्यांना भारतीय हॉकी क्षेत्रातील माजी हॉकीपटू बलबिर सिंग सिनियर, क्लॉडियस, पृथ्वीपाल सिंग, बालकिसन आणि चार्ल्स स्टिफन यांचा सहवास लाभला. 1951 साली बलबिर सिंग ज्युनियर यांची पहिल्यांदा भारतीय हॉकी संघामध्ये निवड झाली होती. 1984 साली ते हॉकी क्षेत्रातून निवृत्त झाले. हॉकी इंडिया तसेच पंजाब हॉकी आणि पंजाबचे राज्यपाल व्हीपी सिंग यांनी बलबिर सिंग ज्युनियर यांना श्रद्धांजली वाहिली.