प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे आपलेच नातेवाईक दूर गेले मात्र एका गर्भवती गायीच्या मदतीसाठी नागरिक एकत्र आल्याची घटना सुत्तगट्टीजवळील राम धाब्यावर घडली. यावेळी सदर गायीवर उपचार करून जीवदान देण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबतची माहिती अशी की, एक चालक गुजरातमधील श्री रामानुजार ऐयरपडी गोशाळा येथून आठ गायींना घेऊन चेन्नईला दि. 19 जून रोजी रवाना झाला. यावेळी वाहनातील एक गाय अशक्त असल्याचे कराड साताराजवळ चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर सदर गाय बेळगाव येथील सुत्तगट्टीजवळील राम धाब्यावर आल्यावर बेशुद्ध पडली. चालकाच्या ही बाब दृष्टीस येताच त्यांनी येथील स्थानिक नागरिकांना मदतीस बोलावून घेतले.
यावेळी लागलीच नागरिकांनी राजू केसरकर यांना संपर्क साधून काकती येथील पशू चिकित्सालयात विनायक केसरकर यांच्या मदतीने उपचारासाठी गायीला आणले. यावेळी वैद्य चंदू यांनी गर्भवती गायीवर उपचार केले. थोडय़ावेळाने गायीच्या तब्येतीत सुधारणा झाल्यावर इतर गायींसोबत चालकाला पुढच्या प्रवासाला पाठविण्यात आले. यावेळी माझा धर्म पशू बचाव दलचे विनायक केसरकर यांनी चालकासोबत असलेल्या परवानगी पत्र आणि इतर कागदपत्रकांची तपासणी केली. आणि चालकाला पुढच्या प्रवासाला चालना दिली.