कोरोना सावटातही गौरी आगमनाने महिलांचा उत्साह द्विगुणित
कणकवली:
लाडक्या बाप्पाच्या आगमनापाठोपाठ रविवारी वाजत-गाजत गौरीचे घरोघरी आगमन झाले. कोरोनाच्या सावटातही गौरी आगमनात महिलांचा दांडगा उत्साह दिसून आला.
कोकणात खडय़ांच्या आणि मुखवटय़ाच्या अशा दोन प्रकारात गौरी आणल्या जातात. पारंपरिक पद्धतीने आघाडा, तिरडा, सोंतळ या वनस्पती घेऊन विहिरी, नदीकिनारी जाऊन या वनस्पतींची विधीवत पूजा करून मृदुंग व टाळांच्या गजरात या वनस्पतींना घरी आणले जाते. घरी नेण्यापूर्वी मीठ, हळद अंगावरून दृष्ट काढल्यानंतर गणरायाच्या डाव्या बाजूला तिची गौरी या रुपात पूजा केली जाते. रात्री गौरीला नऊवारी हिरवी साडी नेसवून तिचा मुखवटा रत्नजडीत आभूषणाने सजवला जातो. त्यानंतर तिला भाकरी भाजीचा नैवेद्य दाखवून विधीवतपणे पूजा केली जाते. दुसऱया दिवशी म्हणजेच गौरीपूजनादिवशी दुपारी काही गावांमध्ये गौरीला मांसाहार नैवेद्य दाखवला जातो तर काही ठिकाणी शाहाकारी नैवेद्य दाखवला जातो. गौरी ही दीड दिवसाची माहेरवाशीण असते. रविवारी सकाळपासूनच माहेरवाशिणी आपल्या माहेरी दाखल झाल्या होत्या. गौरीपूजनादिवशी नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचा ‘ओवसा’ भरण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. प्रत्येक प्रांत आणि भागाप्रमाणे गौरी उत्सवाची पद्धत बदलत असते. सिंधुदुर्ग जिल्हय़ातही वेगवेगळय़ा पद्धती आहेत. काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीही म्हणतात. मात्र, सर्वत्र गौरीचा साजश्रुंगार प्रेमाने करतात.