प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापुरात सोमवारी लोकशाही दिनाची धांदल होती. आरोग्य राज्यमंत्र्यांच्या दौऱयात अधिकारी व्यस्त होते. त्यातच सकाळी सीपीआरमध्ये संशयित रूग्ण आला. ‘करोना’च्या भीतीने ग्रासलेल्या संशयिताने डॉक्टरांनाच दम भरला.. अन् थेट गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. दिवसभर आरोग्य राज्यमंत्र्यांच्या दौऱयात अडकलेले अधिकारी सायंकाळी संशयिताच्या ‘त्या’ धमकीची चर्चा वैद्यकीय वर्तुळात सुरू झाली.
चीनमध्ये करोना साथीचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे भारतात येणाऱया परदेशी नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. राज्य सरकारनेही आरोग्य विभागाला सतर्कतेचे आदेश दिले. त्यामुळे सीपीआरमध्ये करोना रूग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड स्थापन केला आहे. चीनमधून जिल्हय़ात महिनाभरापूर्वी एकजण परतला. त्याला दोन दिवसांपूर्वी घसादुखीचा त्रास सुरू झाला अन् सोमवारी हा संशयित रूग्ण सीपीआरमध्ये सकाळी नऊच्या सुमारास आला. यावेळी ‘ओपीडी’त प्रचंड गर्दी होती. डॉक्टर उपचार करत होते. संशयिताकडे थोडेसे दुर्लक्ष झाल्यामुळे अस्वस्थ झालेल्या या रूग्णाने ‘माझी तातडीने तपासणी करा, अन्यथा तुम्हा डॉक्टरांवर गुन्हा दाखल करतो..’ अशी धमकीच दिली. रूग्णाच्या या धमकीने डॉक्टर हबकून गेले. तातडीने त्यांनी त्याला स्वतंत्र कक्षात आणून त्याची तपासणी केली.
चीनमधून आलेल्या संशयित रूग्णाची डॉ. विजय बर्गे अन् त्यांच्या सहकाऱयांनी तपासणी केली. नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याचे त्याला सांगितले. जाताना संशयिताने पुन्हा डॉक्टरांना धमकी दिली. लोकशाही दिन आटोपून सीपीआरमध्ये आरोग्य राज्यमंत्री आले, पण त्यांनाही येथे संशयित कोरोना रूग्ण आल्याची माहिती नव्हती. त्यांनी यासंदर्भात पेलेल्या उपाययोजनांची माहिती माध्यमांना दिली.
‘तुझी बिले काढतो… पुण्याला नमुने घेऊन जा’
डॉ. बर्गे यांनी करोना संशयित रूग्णाचा स्वाब पुण्याला पाठवायचा असल्याची माहिती वरिष्ठांना दिली. ‘पुण्याला ‘स्वाब’चा नमुना घेऊन जाणाऱया कर्मचाऱयांची मागील बिले थकली आहेत, त्यामुळे त्याने पुण्याला जाण्यास टाळाटाळ केली. अखेरीस व्यवस्थापनाने ‘तुझी बिले काढतो, तू स्वाब घेऊन जा,’ असे सांगितल्यानंतर करोना संशयित प्रकरणावर पडदा पडला. शुक्रवारी कोरोना संशयिताच्या स्वाबचा एनआयव्हीचा अहवाल मिळणार आहे. यानंतर संशयिताकडून येणाऱया प्रतिक्रियेची सीपीआरमधील डॉक्टरांना प्रतिक्षा लागली आहे.