जखमी 3 वर्षीय मुलाच्या रडण्यामुळे रुग्णालय हादरले
माझे वडिल कुठे आहेत? ते येत आहेत का असे प्रश्न एक तीन वर्षीय युक्रेनियन मुलगा डीमा विचारत आहे. रडत तो वारंवार रुग्णालाच्या कर्मचाऱयांना एकच गोष्ट विचारतो. डीमा रशियाच्या बॉम्बवर्षावात गंभीर जखमी झाला होता. शस्त्रक्रियेनंतर तो रुग्णालयात उपचार घेत आहे. तर त्याच्या वडिलांवर रुग्णालयाच्या दुसऱया हिस्स्यात उपचार सुरू आहेत. डीमा आणि त्याचे वडिल दोघेही मारियुपोलमधील संघर्षात जखमी झाले होते.
19 मार्च रोजी बापलेक जखमी झाले होते. त्या दोघांना त्यांच्या शहरातून बाहेर काढत जापोरीज्ज्या येथील रुग्णालयात आणण्यास अनेक दिवस लागल्याची माहिती ऍनेस्थेसियोलॉजिस्ट ओलेना प्लेवेंकिना यांनी दिली आहे. डीमा स्वतःच्या वडिलांसाठी सातत्याने रडतोय आणि ते कुठे आहेत अन् कधी येणार असे प्रश्न विचारत आहे. तुझे वडिल वाटेत आहेत, लवकरच येतील असे म्हणत एका नर्सने त्याची समजूत काढली आहे. स्वतःच्या वडिलांवरही उपचार सुरू आहेत हे डीमाला माहित नाही.
रशियाचे सैन्य एक महिन्याहून अधिक काळापासून मारियुपोलवर बॉम्बवर्षाव करत आहे. हे शहर युक्रेनच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहे. याचमुळे युद्ध सुरू झाल्यापासून रशियाने या शहराला लक्ष्य करणे सुरूच ठेवले आहे. रशियाच्या हल्ल्यात 200 हून अधिक मुलांसमवेत सुमारे 5 हजार लोक मारले गेल्याचा दावा शहराच्या महापौराच्या प्रवक्त्याने केला आहे.