शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शिक्षण विभागाची माहिती
प्रतिनिधी/ कोल्हापूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील पहिली ते चवथी व शहरात पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग अद्याप बंद आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी शाळांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन वर्ग सुरू ठेवून ‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ हा उपक्रम राबवण्याचे आदेश शासनाने परिपत्रकाव्दारे दिले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्हय़ातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम पूर्ण क्षमतेने राबवण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा परिषद व महापालिका शिक्षण विभागाने घेतला आहे.
‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहचवण्यासाठी स्मार्ट फोन किंवा अन्य डिजीटल साधने आहेत का? ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल आहेत आणि ज्यांच्याकडे मोबाईल नाहीत त्यांची यादी तयार करून शासनाला सादर करावयाची आहे. तसेच शिक्षण प्रवाहात नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम उपयोगी ठरणार आहे. कोल्हापूर जिल्हय़ातील महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मंगळवारपासुन या उपक्रमाला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती करवीर गटशिक्षणाधिकारी तथा महापालिका प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासक शंकर यादव यांनी दिली.