नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, रविवारी ‘ मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मिल्का सिंग यांचं स्मरण केलं. त्याचसोबत त्यांनी टोकियो ऑलिंपिकसाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देखील दिल्या. तसेच लसीची भीती दूर करण्यासाठी गावकऱ्यांसोबत संवाद साधत नागरिकांना लस घेण्याचं आवाहन केलं. माझ्या आईने आणि मी लसीचे दोन्ही डोस घेतले त्यामुळे आपण ही लस घ्या असे आवाहन देखील पंतप्रधान मोदींनी यावेळी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना मध्य प्रदेशातील भीमपूर जिल्ह्यातील दुलारिया गावातील राजेश हिरावे या ग्रामस्थाने कोरोना लसीबद्दल भीती व्यक्त केली. नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातमध्ये राजेश हिरावे यांना फोन करून त्यांच्याशी यासंबंधी चर्चा केली व त्यांच्या मनातील लसीसंबंधी भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. राजेश हिरावे यांनी सांगितले की, व्हॉट्सअॅपवर लसीसंबंधी वेगवेगळे मेसेज येत आहेत, त्यामुळे लस घ्यायची भीती वाटत आहे. म्हणूनच मी लसीकरणाला गेलो नाही. यावर मोदींनी त्यांना मी आणि १०० वर्षीय आईने कोरोना लस घेतल्याचे सांगत लसीपासून घाबरण्याची गरज नसल्याचे देखील सांगितले.
कोरोना लसीबद्दल जर मनात भीती असेल तर ती काढून टाका. संपूर्ण देशातील ३१ कोटींपेक्षा जास्त लोकांनी लस टोचून घेतली आहे. मी स्वत: देखील दोन्ही डोस घेतले आहेत. माझी आई तर जवळजवळ १०० वर्षांची आहे. तिनेसुद्धा दोन्ही डोस घेतले आहेत. कधीकधी एखाद्याला ताप वगैरे येतो, परंतु हे अगदी किरकोळ आहे, काही तासांसाठीच होते. लस न घेणे खूप धोकादायक ठरू शकते. यामुळे तुम्ही स्वत:लाच केवळ धोक्यात टाकता असे नाही तर, तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आणि गावाला धोक्यात टाकता. लवकरात लवकर लस घ्या आणि गावातील प्रत्येकाला सांगा की भारत सरकार विनामूल्य लसीकरण करत आहे आणि १८ वर्षांच्या वरील सर्व लोकांसाठी हे विनामूल्य लसीकरण आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.