पाटबंधारे कार्यकारी अभियंता जे एम पाटील याची माहिती
ओटवणे / प्रतिनिधी:
माडखोलवासियांचा विरोध लक्षात घेऊन माडखोल येथील भराडी देवी पाणी वापर संस्थेची बहुचर्चित निवडणूक प्रक्रिया सिंधुदुर्ग पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जे एम पाटील यांनी अखेर स्थगित केली आहे. माडखोल येथील भराडी देवी पाणी वापर संस्थेच्या संचालक मंडळाची मुदत दोन वर्षापूर्वी ३१ जुलै २०१९ रोजी संपलेली असल्याने सन २०१९ ते २०२५ या कालावधीकरीता नवीन संचालक मंडळाची निवड करणे करीता सावंतवाडी पाटबंधारे उपविभागीय अभियंता संतोष कविटकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी असल्याने
भराडी देवी पाणीवापर संस्थेची संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू केली होती. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग ४ महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम २००५ दिनांक ८ जून २००६ मार्गदर्शक सूचनेनुसार ही निवडणूक प्रक्रिया राबविली जाते.
मात्र भराडीदेवी पाणी वापर संस्था व ग्रामस्थांनी माडखोल धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या पाईपलाईनच्या कामासंदर्भात तक्रार करून संबधित उपविभागीय अभियंता यांची बदलीची मागणी केल्याने याची चौकशी करणेकरीता चौकशी अधिकारी यांची नेमणूक करून चौकशी करण्याचे काम सुरू आहे. तसेच संबंधित उपविभागीय अभियंता सध्या रजेवर आहेत त्यामुळे उपविभागीय अभियंता तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे पद सद्यस्थितीत रिक्त आहे. तसेच सदर चौकशी अहवाल येत नाही तोपर्यंत त्यांच्या जागी कायमस्वरूपी उपविभागीय अभियंत्यांची नियुक्ती होणार नाही.
सद्यस्थितीत उपविभागीय अभियंता तथा निवडणूक अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया करता येणार नसल्याचे व यात तांत्रिक अडचणी येत आहेत. कालव्यांच्या कामाबाबत पंधरा दिवसांमध्ये चौकशी पूर्ण होईल अथवा रिक्त पदी नियुक्ती होईल तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे श्री पाटील यांनी स्पष्ट केले.