लॉकडाऊन असूनही वाढती वर्दळ, तक्रारींची दखल घेऊन उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांच्याकडून कारवाई
प्रतिनिधी / सांगे
कोरोनामुळे गोव्यात सर्वत्र लॉकडाऊन असून 144 कलम अस्तित्वात आहे. सायंकाळच्या 7 नंतर विनाकारण फिरता येत नाही. असे असले, तरी वालकिणी वसाहत क्रमांक 1 जवळ असलेले माडेल-साळावली येथील पर्यटनस्थळ सध्या प्रेमी युगुलांचे मौजमजा करण्याचे ठिकाण बनले असून या ठिकाणी लोकांचा संचार वाढत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्याने उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी जलस्रोत खात्याच्या अधिकाऱयांना बरोबर घेऊन नुकतेच या स्थळाच्या मुख्य फटकाला टाळे ठोकले.
सदर ठिकाणी युवक-युवती फिरायला येण्याचे प्रमाण वाढले असून तेथे कुणाचेही नियंत्रण नाही, असे दिसून येऊ लागले होते. या पार्श्वभूमीवर या ठिकाणाला उपजिल्हाधिकारी गावडे यांनी काही दिवसांपूर्वी अचानक भेट दिली असता अनेक आक्षेपार्ह गोष्टी त्यांच्या नजरेस आल्या. त्यानंतर वरील कारवाई करण्यात आली. सदर पर्यटनस्थळ जलस्रोत खात्याने विकसित केले होते. तेथे जाण्यासाठीचा रस्ता वन विभागाच्या अखत्यारित येतो. मात्र या दोन्ही खात्यांनी नीट देखभाल करण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
सुमारे पाच वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या माडेल-साळावली येथील या स्थळाने नंतरच्या काळात चांगले पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येण्यापेक्षा अनैतिक प्रकारांचे ठिकाण म्हणून अधिक नावलौकिक मिळविला. एका बाजूने जंगल, दुसऱया बाजूने जलाशय व मध्ये जलस्रोत खात्याने कोटय़वधी रुपये खर्चून तयार केलेला हा परिसर आहे. अर्धवट काम करून खात्याने हा परिसर सोडून दिल्याने त्याला ओसाड स्वरूप आले. येथील सौरऊर्जेवर चालणाऱया दिवाबत्तींची तोडफोड करण्यात आली आहे. आतील भागात सर्वत्र झाडे-झुडपे वाढलेली आहेत. पोलीस नाही, सुरक्षा रक्षक नाही, जवळपास लोकवस्ती नाही.
अनैतिक प्रकार, अमली पदार्थांच्या व्यवहारांचा अड्डा
अशा निरव ठिकाणी अनैतिक प्रकारांना ऊत येऊ लागला होता. त्याचबरोबर तो अमली पदार्थांचा अड्डा बनला होता. अमली पदार्थांचे सेवन वा विक्री करणारी टोळकी, प्रेमी युगुले आणि आंबटशौकीन अशा लोकांची माडेल भागात दिवसभर व खास करून संध्याकाळी वर्दळ वाढू लागली होती. उघडय़ा फाटकातून दुचाक्मया नेऊन आडोशाला पार्क केल्या जात असत.
सातच्या आत घरात असा आदेश राज्यभर असताना उत्तर आणि दक्षिण गोव्यातील विविध भागांतून आलेली प्रेमी युगुले अंधार होत आला, तरी येथील निर्जन ठिकाणी बसण्याचे धाडस करत असत. काही जण रात्रीच्या वेळी ओल्या पाटर्य़ा करत असत. माडेल भागात उपजिल्हाधिकारी गावडे, मामलेदार मनोज कोरगावकर यांनी स्वतः पाहणी करून या भागात काय प्रकार घडतात ते पहिले. यावेळी तेथे असलेल्यांना दम भरून परत या भागात फिरकू नये असे बजावून हाकलून लावण्यात आले. तसेच नंतर मुख्य फाटकाला टाळे ठोकण्याची कारवाई करण्यात आली.