कुर्डुवाडी / प्रतिनिधी
माढा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून सत्ताधारी ॲड. धनाजी साठे गटाने (काँग्रेस आय) १२ जागा मिळवत आपले वर्चस्व कायम राखले आहे. आ. बबनदादा शिंदे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागेचे नुकसान झाले असून दोन जागेवर समाधान मानावे लागत आहे. तर शिवसेना २, अपक्षाला १ जागा मिळाली आहे.
माढा लोकसभा मतदार संघाचे भाजपचे खा. रणजितसिंह निंबाळकर यांच्या मतदार संघात भाजपला एकही उमेदवार रिंगणात उतरवता आला नाही हे मात्र विशेष. मागील काळात केलेल्या विकास कामांच्या जोरावर काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत एक हाती वर्चस्व निर्माण केले आहे.
काँग्रेस आय-माजी नगराध्यक्ष मीनल साठे, माजी सभापती कल्पना जगदाळे, अरुण कदम, विकास साठे, शबाना बागवान, वंदना लंकेश्वर, रेशमा लंकेश्वर, नितीन साठे, निर्मला थोरात, मोहिनी नेटके व प्रभाग क्रमांक एकमधून आजिनाथ भागवत राऊत व सुनिता अजिनाथ राऊत हे दाम्पत्य विजयी झालेआहेत. राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते चंद्रशेखर गोटे, माजी नगरसेविका संजीवनी भांगे, शहाजी साठे गटाचे संगिता शहाजी साठे, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे यांच्या पत्नी अर्चना कानडे, शिवसेनेच्या अनिता चवरे या निवडणुकीत विजयी झाले आहेत.
कॉग्रेस आय- १२ , राष्ट्रवादी काँग्रेस – २ , शिवसेना व अपक्ष – ३.