पाचवर्षीय कौस्तुभच्या उपचारासाठी मदतीचे अनेक हात पुढे : ‘तरुण भारत’ सोशल मीडिया ग्रुपच्या आवाहनाला प्रतिसाद : निवतीतील चोपडेकर कुटुंबीय गहिवरले
प्रतिनिधी / कुडाळ:
कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक झळ सर्वांनाच बसत असतानाही माणुसकीचा झरा अजूनही जिवंत असल्याचा प्रत्यय निवती येथील दशावतारी कलाकार जनार्दन विश्राम चोपडेकर यांना आला.
त्यांच्या पाचवर्षीय कौस्तुभ या मुलाच्या आजारपणावर उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे ‘तरुण भारत’ सोशल मीडिया ग्रुपवरून आवाहन करण्यात आले आणि समाजातील सर्वच स्तरांतून मदतीसाठी हात पुढे आले. वकील, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य आदी क्षेत्रांसह सर्वसामान्यांनी मदतीचे हात पुढे करीत कौस्तुभची प्रकृती बरी होण्यासाठी जणू आशीर्वादच दिले.
गेले पंधरा दिवस कौस्तुभ हा कुडाळ येथील डॉ. रावराणे रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याला आतडय़ाचा आजार असल्याने त्याला रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात आले. या उपचारासाठी खर्चही मोठा आहे. जना चोपडेकर हे दशावतारी कलाकार असून त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. अशातच वडीलही बांबोळी-गोवा येथे उपचार घेत आहेत.
कौस्तुभ
हा चुणचुणीत मुलगा या आजारातून बरा व्हावा, यासाठी चोपडेकर कुटुंबीय प्रार्थना करत
आहेत. अशातच ‘तरुण भारत’ सेशल मीडिया ग्रुपवरून एका पोस्टद्वारे मदतीचे आवाहन बुधवारी
रात्री साडेनऊ वाजता करण्यात आले. नंतर ग्रुपच्या अनेक सदस्यांनी त्यावर चर्चा घडवत
आपण खारीचा वाटा उचलून
प्रत्यक्ष मदतीचा हात द्यावा, असे ठरवून मदतीचे हात पुढे केले. चोपडेकर
यांचा बँक खाते क्रमांक मागवून घेत रात्रीच थेट खात्यात रक्कम जमा करण्यास सुरुवात
केली. डॉक्टर, आरोग्य क्षेत्रात काम करणाऱयांनी दूरध्वनीवरून चौकशी करत सर्व मदत देण्याचे
आश्वासनही दिले.
गुरुवारी सकाळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन रोख स्वरुपात मदतही केली. अल्पावधीतच काही हजाराची मदत जमा झाली. कुडाळ परिसरात फारशी ओळख नसतानाही मिळालेल्या या मदतीमुळे चोपडेकर भावूक बनले. कौस्तुभ याच्यावर अजूनही आठ-दहा दिवस उपचार करावे लागणार आहेत. ज्यांना मदत करायची आहे, त्यांनी जनार्दन विश्राम चोपडेकर, बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा पाट-परुळे, खाते क्रमांक : 68005390715, IFSC CODE MAHB 0000508 या खात्यात जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.