वार्ताहर/ लोधवडे
पळशी (ता. माण) गावचे सुपुत्र डॉ. नितीन खाडे हे आसाम राज्याच्या आरोग्य विभागाच्या सचिवपदी तर खटावमधील एनकूळचे सुपुत्र डॉ. सुदाम खाडे हे सध्या मध्यप्रदेशच्या आरोग्य विभागाच्या डायरेक्टर पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. संपूर्ण जगात कोरोनाच्या रोगाने थैमान घातले असताना देशामधील प्रमुख राज्य असणाऱया आसाम व मध्यप्रदेशच्या आरोग्य विभागाचा कार्यभार हा सातारा जिह्याचे सुपुत्र सांभाळत असल्याचा अभिमान जिल्हावासियांना आहे.
संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच प्रशासकीय अधिकाऱयांशी सतत संपर्क असून या भयानक परिस्थितीचा मुकाबला कसा करायचा याकडे लक्ष ठेवून आहेत.
आसाम हे देशातील छोटेसे राज्य असले तरी या ठिकाणी देशभरामधून असंच पर्यटक येत असतात. आजअखेर येथे कोरोना बाधितांची संख्या अल्प दिसून येत आहे. तर मध्यप्रदेशामध्ये या आजाराने अक्षरशः थैमान घातले आहे. देशात महाराष्ट्रानंतर सर्वाधिक जवळपास 53 मृत्यू झाले आहेत. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी नुकतीच मध्यप्रदेश सरकारने आरोग्य विभागाच्या डायरेक्टरपदी डॉ. सुदाम खाडे यांची नियुक्ती मध्यप्रदेश सरकारने केली आहे. विशेष म्हणजे आसाम व मध्यप्रदेशच्या आरोग्य विभागाचा कार्यभार या दोन्ही प्रशासकीय अधिकारी सांभाळत आहेत. हे दोघे सातारा जिह्यातील असल्याचा जिल्हावासियांना सार्थ अभिमान वाटत आहे.
नितीन खाडेंची प्रशासकीय कारकिर्द
नितीन खाडे (2004 बॅचचे) यांना आसाम केडर मिळाल्यानंतर माझोली या ठिकाणी प्रांत म्हणून कार्यभार सांभाळला. माझोली हे ब्रम्हपुत्रा नदीवरील जगातील सर्वात मोठे बेट ओळखले जाते. त्यानंतर जिल्हाधिकारी म्हणून उत्तरलखीमपूर, कोकराझा येथे काम केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना काही कालावधीसाठी महाराष्ट्रात काम करण्याची संधी मिळाली. या काळात त्यांनी बीड व अकोला येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून उल्लेखनीय काम केले. यावेळी बीड जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविलेल्या ‘आयुर्मंगलम’ या उपक्रमाची तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी कौतुक केले. पुन्हा महाराष्ट्रातील कार्यकाल पूर्ण झाल्यावर आसाममध्ये अतिरिक्त निवडणूक आयुक्त, म्हणून काम पाहिले.
डॉ. सुदाम खाडेंची प्रशासकीय कारकिर्द
डॉ. सुदाम खाडे मध्यप्रदेशमध्ये सिहोर, तसेच मध्यप्रदेशची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱया भोपाळचे जिल्हाधिकारीपद यशस्वी सांभाळले. सध्या त्यांची मध्यप्रदेश सरकारने आरोग्य विभागाच्या डायरेक्टरपदी नियुक्ती केली आहे.
नक्कीच नितीन खाडे व डॉ. सुदाम खाडे हे दोन प्रशासकीय अधिकारी आपापल्या ठिकाणी कोरोनाशी यशस्वी लढा देऊन सातारीबाणा दाखवून देतील.
सध्या नितीन खाडे यांच्याकडे 5 विभागाचा कार्यभार सांभाळत आहेत. अर्थ विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त, आरोग्य विभागाचे सचिव, सह अन्य विभागाचा कार्यभार सांभाळत आहेत. तसेच आसाममधील परिस्थिती सध्या स्थिर असून केवळ 1 मृत्यू झाला आहे. जवळपास 75 हजार लोकांचे होमक्वारंटाईन मागील आठवडय़ात पूर्ण झाले असल्याचे सांगितले. परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असून सर्वांनीच काळजी घेणे जरूरीचे असल्याचे सांगितले. डॉ. सुदाम खाडे हे एम.डी मेडीसीन आहेत. शिवाय राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू आहेत. त्यांनी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळचे जिल्हाधिकारी, भोपाळ स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे चेअरमन म्हणून उत्तम काम केले. तसेच सिहोर, निकामगढ, हर्डाच्या जिल्हाधिकारी पद यशस्वी सांभाळले. शेरपूर (जि. सिहोर) येथे कृषी विमा योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात पंतप्रधानांच्या उपस्थितीत तत्कालीन विदेशमंत्री स्व. सुषमा स्वराज यांनी सिहोर जिह्यात जिल्हाधिकारी डॉ. सुदाम खाडे यांनी प्रधानमंत्री सिंचन योजनेच्या केलेल्या कामाचे कौतुक करून ही योजना संपूर्ण देशात लागू केली पाहिजे, असे गौरवोद्गार काढले होते.