वार्ताहर/ कराड
अनुसूचित जाती प्रवर्गात अ, ब, क, ड प्रमाणे विभाजन करून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी दलित महासंघाच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास दलित महासंघाच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी दिला.
समतावादी महिला मंचच्या अध्यक्षा प्रा. पुष्पलता सकटे, सरचिटणीस प्रकाश वायदंडे, जिल्हाध्यक्ष रमेश सातपुते, राम दाभाडे, दिलीप सकटे, शैलेश भिंगारदेवे, रामभाऊ सातपुते, हरीभाऊ बल्लाळ, सुरेश बडेकर, राजेंद्र आवळे, सुरज घोलप, भास्कर तडाखे, जाई वायदंडे, आरती वायदंडे, स्नेहल वायदंडे, रेश्मा पवार व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्ह्टल्याप्रमाणे, अनुसूचित जाती प्रवर्गात एकुण 59 जातींचा समावेश असून यातील एकाच जातीला आरक्षणाचा फायदा होत आहे. तर अन्य 58 जाती आरक्षणापासून वंचित राहात आहेत. त्यामुळे शासनाने अनुसूचित जाती प्रवर्गात अ, ब, क, ड प्रमाणे विभाजन करून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) प्रमाणेच आण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण सस्थेची (आर्टी) स्थापना करावी, सरकारच्या अन्य खात्यात गैरप्रकार अथवा भ्रष्टाचार झाला तर दोषींवर कारवाई होते. पण ते खाते सुरू रहाते या उलट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळात गैरप्रकार, भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनात आल्याने सहा वर्षांपासून हे महामंडळच बंद केले आहे. त्यामुळे मातंग समाजाचा आर्थिक विकास खुंटला आहे. त्यामुळे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळ सुरू करावे. तसेच या महामंडळाचे भागभांडवल 1 हजार कोटी रूपये करावेत.
सर्व मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे कर्जदारांना संपूर्ण कर्ज माफी देण्यात यावी, अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, आदी मागण्या निवेदनाव्दारे करण्यात आल्या आहेत.