मध्यप्रदेशमधील दुर्घटना : मृतांचा आकडा वाढण्याची भीती
इंदोर / वृत्तसंस्था
मध्यप्रदेशमधील शहडोल जिल्हय़ातील पपरेडी गावात मातीची खाण कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमध्ये 6 जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अजूनही दहा ते बाराहून अधिक लोक या खाणीत अडकल्याची माहिती स्थानिकांनी दिल्यानंतर घटनास्थळावर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. जेसीबीच्या सहाय्याने ढिगारे उपसण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. मात्र, पावसामुळे मदतकार्यात अडथळा येत होता. दरम्यान, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. स्थानिक प्रशासनाने याप्रकरणी तपास सुरू केला असून सदर खाणीमध्ये बेकायदा उत्खनन होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच सदर खाणीतील मातीचा वापर रंगनिर्मितीसाठी केला जात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
शहडोल जिल्हय़ातील ब्यौहारी पोलीस क्षेत्रात शनिवारी सकाळी मातीची खोदाई सुरू असताना ढिगारे कोसळले. ही दुर्घटना घडली त्यावेळी 24 ते 25 जण तेथे वावरत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. खाणीत खोदकाम सुरू असताना ग्रामस्थ व मजूर मोठय़ा संख्येने उपस्थित होते. अशात काम करताना अचानक मातीचा काही भाग खचला. चिखलामुळे अनेक कामगार बाहेर येऊ शकले नाहीत.
अपघात घडताच गावकरी आणि स्थानिक मदतीसाठी धावले. त्यानंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासनालाही माहिती देण्यात आली. प्रशासकीय यंत्रणेने तात्काळ मदतकार्य सुरू केले. मात्र, काही वेळातच सहा जणांचे मृतदेह हाती लागले होते. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर अजूनही काही लोक खाणीत अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.