ऑनलाईन टीम / मुंबई :
एका कर्जबाजारी शेतकऱयाने आपल्या लहान मुलीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्या शेतकऱयाला ताब्यात घेऊन खेरवाडी पोलीस ठाण्यात नेले आहे.
देशमुख असे या शेतकऱयाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा शेतकरी पनवेलचा असून, बँकेच्या कर्जाने तो हैराण झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी हा शेतकरी आपल्या आठ वर्षाच्या मुलीसह आला होता.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सकाळपासून मातोश्रीबाहेर तो उभा होता. मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही, असे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना आतमध्ये सोडण्याची विनंती केली. मात्र, पोलिसांनी त्यांना आत सोडले नाही. त्यामुळे देशमुख यांनी थेट मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि देशमुख यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यानंतर देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतले. देशमुख सध्या खेरवाडी पोलीस ठाण्यात आहेत.