ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. चार दिवस चाललेल्या या छापेमारीत आयकर विभागाने जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये एक डायरी आढळून आली आहे. ज्यामध्ये मातोश्रीला गुढी पाडव्याच्या दिवशी 2 कोटींचे पेमेंट आणि 50 लाखांचं घडय़ाळ दिल्याची नोंद आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंगल्याचेही नाव मातोश्री आहे. त्यामुळे असा काही व्यवहार झाला आहे का, याचा तपास आयकर अधिकारी करत आहेत.
यशवंत जाधव यांनी 24 महिन्यात मुंबईत 36 इमारती खरेदी केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर आयकर विभागाने जाधव यांच्या घरावर आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर छापेमारी केली होती. 130 कोटींहून अधिक रकमेचा हा घोटाळा असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा तपास सुरू असतानाच जाधव यांची गुप्त डायरी आयकर अधिकाऱ्यांच्या हाती लागली. त्यामध्ये त्यांच्या व्यवहाराची पोलखोल झाली. या डायरीत निवासी इमारतीतील भाडेकरू हक्क संपादन करण्यासाठी 10 कोटी रोख दिले. गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला 2 कोटींचे पेमेंट केले. ‘मातोश्री’ला 50 लाखांचे घडय़ाळ पाठवले, अशा नोंदी आहेत.
दरम्यान, यशवंत जाधव यांनी मातोश्री म्हणजे आपली आई असल्याचे म्हटले आहे. आपल्याला दानाची 2 कोटी रुपयांची रक्कम मिळाली. याचा वापर गुढीपाडव्याच्या भेटवस्तू देण्यासाठी केला. माझ्या आईच्या नावावर लोकांना 50 लाखांच्या घड्याळांचे वाटप केल्याचा दावा त्यांनी केला आहे. पण आयकर अधिकारी जाधव यांच्या उत्तरावर समाधानी नाहीत. ते यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.