ओटवणे-कारिवडे सिमेदरम्यानच्या जंगल परिसरातील ग्रामस्थांत घबराट
प्रतिनिधी / ओटवणे:
ओटवणे-कारिवडे सीमेदरम्यानच्या जंगलात मादी बिबटय़ासह तिच्या दोन बछडय़ांच्या मुक्त संचारामुळे परिसरातील ग्रामस्थ, महिला व मुलांसह वाहनचालकांत भीतीचे वातावण आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या परिसरात मादी बिबटय़ासह तिच्या बछडय़ांचा वावर असून या भागात त्यांच्या पाऊलखुणांसह विष्टाही सापडली आहे.
याबाबत कारिवडे येथील युवा सामाजिक कार्यकर्ते रवी परब यांनी वनपाल प्रमोद सावंत आणि वनरक्षक महादेव गेजगे यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी तात्काळ या दोन्ही गावाच्या सीमेवरील जंगलात पाहणी केली. यावेळी वनरक्षक महादेव गेजगे यांना या बिबटय़ांच्या पाऊलखुणांसह विष्टाही काही ठिकाणी आढळली आहे. त्यांनी हा परिसर पिंजून काढला. या भागात पाण्यासह हिरव्या चाऱयाची सोय असल्याने वन्यप्राण्यांसाठी हा भाग पोषक आहे.
कारिवडेतील स्वप्निल परब हे आपल्या कारने गोव्यातून घरी येत असताना त्यांच्यासह कुटुंबियांनी बिबटय़ांना पाहिले. तसेच महेश परब यांच्यासह काही गुराख्यांनाही त्यांचे दर्शन घडले. या दोन्ही गावाच्या सीमेदरम्यानच्या जंगल पायथ्याशी लोकवस्ती आहे. तसेच ओटवणे आणि कारिवडे हे दोन्ही गाव जोडणारा मुख्य रस्ता याच जंगलातून जात असल्याने या दोन्ही गावात भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, या मादी बिबटय़ासह दोन्ही बछडय़ांचा नेमका अधिवास कुठे आहे हे मंगळवारी स्पष्ट झाले नसून या दोन्ही गावाच्या सीमेदरम्यानच्या ग्रामस्थांसह महिला व मुलांसह वाहनचालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सावंत आणि गेजगे यांनी कले आहे. 0/