नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने माधबी पुरी बुच यांची सिक्मयुरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती सुरुवातीला 3 वर्षांसाठी असेल. आतापर्यंत त्या सेबीच्या पूर्णवेळ संचालक होत्या. तत्पूर्वी त्यांनी 12 वर्ष आयसीआयसीआय बँकेत विविध पदांवर काम केले आहे. सेबीचे विद्यमान अध्यक्ष अजय त्यागी यांचा कार्यकाळ 28 फेब्रुवारी रोजी संपल्यामुळे आता मंगळवारपासून त्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील. गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे हे ‘सेबी’चे मुख्य कार्य आहे. त्याशिवाय बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) यांच्या कार्यावरही सेबी देखरेख ठेवत असते.
हिमाचल प्रदेश केडरचे 1984 बॅचचे आयएएस अधिकारी अजय त्यागी यांनी पाच वर्षापूर्वी (1 मार्च 2017) सेबीच्या अध्यक्षपदाचा कारभार हाती घेतला होता. त्यावेळी अजय त्यागी यांची केवळ तीन वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या कालावधीत सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान, ऑगस्ट 2020 मध्ये त्यांचा कार्यकाळ आणखी 18 महिन्यांनी वाढवण्यात आला. त्यानुसार, त्यागी यांचा कार्यकाळ सोमवारी समाप्त झाला. त्यानंतर आता माधबी पुरी बूच यांच्याकडे पुढील तीन वर्षांसाठी सूत्रे सोपविण्यात आली आहेत.