नाईकांच्या वाडय़ात शांतता
वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडीपासून जवळच असलेला आकेरी येथील नाईकांच्या वाडय़ातील गजबज आता थांबली आहे. गेली चार वर्षे हा अण्णा नाईकांचा वाडा ‘रात्रीस खेळ चाले’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेमुळे पर्यटनस्थळ बनले होते. या मालिकेचा पार्ट टू (412 भाग) प्रसारित झाल्यावर वर्षभरानंतर 29 ऑगस्टला अण्णा नाईकांच्या मृत्यूने अखेर ‘माधवा… अण्णा गेले’ या दत्ताच्या शेवटच्या डायलॉगने मालिकेचा शेवट करण्यात आला. आता प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे ती या मालिकेच्या तिसऱय भागाची. निर्माता, दिग्दर्शक, लेखक त्या दृष्टीने विचार करत आहेत. येत्या काळात तिसरा भाग येण्याची शक्यता आहे.
मालवणी भाषेत प्रथमच झी मराठी वाहिनीने ‘रात्रीस खेळ चाले’ मालिका
आणली. कोकणातच त्या मालिकेचे शूटिंग तसेच पहिल्या भागात स्थानिक कलाकारांचा सहभाग होता. मालिकेच्या पहिल्या भागातील देवदेवस्की, भूतपिशाच्च यावर आधारित घटनांना कडाडून विरोध झाला. तरीही मालिकेने एक हजार भाग पूर्ण केले. त्यानंतर नोव्हेंबर 2019 ला दुसऱया भागाचे शूटिंग करण्यात आले. दुसऱया भागात अण्णा नाईक (माधव अभ्यंकर), शेवंता (अपूर्वा नेमळेकर), माई-(शपुंतला नरे), दत्ता (सुहास शिरसाठ), पांडू (प्रल्हाद कुडतरकर), गुरव (अनिल गावडे), नाथा (उदय पास्ते), सरिता (प्राजक्ता वाडये), छाया (नम्रता कुडाळकर) आदी कलाकारांचा सहभाग होता.
मार्चनंतर कोरोनाचे संकट आले. त्यामुळे चार महिने मालिका बंद होती. पण 15 जुलैपासून पुन्हा शूटिंग सुरू करण्यात आले. आता 29 ऑगस्टला या मालिकेचा शेवट अण्णा नाईकांच्या मृत्यूने करण्यात आला आहे. या मालिकेचे निर्माते सुहास भोसले, दिग्दर्शक राजू सावंत, मालवणी संवाद लेखक व अभिनेते
प्रल्हाद कुडतरकर यांनी यापूर्वी या मालिकेचे भाग आवडल्यास तिसरा भाग आणू असे स्पष्ट केले होते. या मालिकेच्या सेटवर ‘चला हवा येऊ द्या’चे निर्माते, अभिनेते डॉ. नीलेश साबळे यांनी ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेवर चित्रपट साकारण्याचा मनोदय व्यक्त केला होता.
अभिनेते माधव अभ्यंकर यांनी सांगितले की, कोकणात विशेषत: सावंतवाडीत शूटिंग झाले. हा भाग सुंदर आहे. लोकही चांगले आहेत. आम्ही सर्व कलाकार म्हणजे आमचे कुटुंब बनले होते. मालिका संपली तरी आमचे नाते घट्ट राहणार आहे.
रात्रीस खेळ चाले मालिकेचा तिसरा भाग येणार की चित्रपट येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. परंतु आकेरीचा नाईक वाडा पर्यटन स्थळ, सेल्फी पॉईंट बनला आहे.