आमदार दिगंबर कामत यांचे निवेदन : भाजप प्रवेशाचे वृत्त लावले फेटाळून
प्रतिनिधी /पणजी
आपण व आपली पत्नी दोघेही दिल्लीतील मित्राच्या घरच्या लग्नाला गेलो होतो. मात्र त्यासंदर्भात माध्यमांमध्ये ज्या बातम्या लागल्या ते पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसल्याचे निवेदन करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी पक्षांतराच्या कपोलकल्पित वृत्त फेटाळून लावले.
नवी दिल्लीला गेलेले दिगंबर कामत सपत्निक सायंकाळी 7 वा. गोव्यात पोहोचले. दाबोळी विमानतळ प्रकल्पावरून या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी माध्यम क्षेत्रात जे कोणी आपल्या विरोधात अफवायुक्त बातम्या पसरवित आहेत त्यांची आपल्याला किव येते. ‘इंडिया टुडे’ च्या एका संपादकाचा देखील आपल्याला फोन आला. त्यांना आपण वस्तुस्थिती कळविली, त्यालाही आश्चर्य वाटले. माध्यमांनी अशा बातम्या प्रसारित करताना स्वतःची विश्वासार्हता जपणे आवश्यक आहे.
नको असलेले काही करणार नाही
आपण पुन्हा एकदा सांगतो आपण काँग्रेस पक्षावर नाराज नाही. उलटपक्षी काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर मायकल लोबो व नूतन प्रदेशाध्यक्ष हे आपल्याला भेटण्यास मडगावला आपल्या घरी आले. दोघांचेही आपण जोरदार स्वागत केले. आपण एक ज्येष्ठ नेता आहे. या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कारभार आपण सांभाळलेला आहे. आपण नको असलेले काही करणार नाही. राजकारणात आपण जी काही पावले उचललेली आहेत ती नेहमीच दर्जा राखून. या उलट आपल्याला काहीच बोलायचे नाही. नाराजी वगैरे सर्व काही बंद, असे कामत म्हणाले.
वृत्त पाहून आश्चर्याचा धक्का
आपण आपल्या पत्नीसह नवी दिल्लीत एका मित्राच्या नातेवाईकाच्या लग्नाला गेलो होतो. मंगळवारी गेलो व बुधवारी सायंकाळी हा पहा आताच परतलो. तोपर्यंत आपण दुसऱया पक्षात जाणार वगैरे वाट्टेल त्या बातम्या माध्यमांनी देताना आपला जरासुद्धा विचार केला नाही. विश्वासार्हता थोडी जपली असती तर बरे झाले असते. आपल्याला देखील प्राव्हेट लाईफ आहे. कुटुंबासमवेत कुठे गेलो तरी ही त्यावर तर्कवितर्क ! आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसल्याचे दिगंबर कामत पुढे म्हणाले. या सर्व अफवा कोण तयार करतोय त्याच्याशी माझे कोणतेही देणेघेणे नाही असे त्यांनी सांगितले.