चतुर्थ श्रेणीपदे कंत्राटी पद्धतीने भरण्याला संस्था चालक मंडळाचा विरोध
प्रतिनिधी / ओरोस:
शाळा-महाविद्यालयांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदे कंत्राटी पद्धतीने रोख मानधनावर भरण्याच्या शासनाच्या सुधारित आकृतिबंधाच्या निर्णयाविरोधात सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्था चालक मंडळाने आवाज उठवला आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात 18 डिसेंबर रोजी जिल्हय़ातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून निषेध नोंदविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा संस्था चालक मंडळाचे अध्यक्ष जी. एम. सामंत यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाने अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱयांची पदे गोठवून सुधारित आकृतिबंध लागू केला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील 52 हजार चतुर्थश्रेणी कर्मचारी पदे संपुष्टात येणार आहेत. तसेच यापुढे शिपाई, नाईक, पहारेकरी, प्रयोगशाळा परिचर आदी पदे कंत्राटी पद्धतीने ग्रामीण भागातून अवघ्या पाच हजार, तर शहरी भागातून साडेसात हजार रुपये मानधनावर नियुक्त केली जाणार आहेत. हा निर्णय अन्यायकारक असून शिक्षण क्षेत्रावर गंभीर परिणाम करणार असल्याचा आरोप सामंत यांनी केला आहे. या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळाने एक दिवशीय शाळा बंद आंदोलनाची हाक दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा संस्था चालक मंडळानेही यात सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.
विद्यालयाची जबाबदारीची कामे कंत्राटी पद्धतीच्या कर्मचाऱयांकडून जबाबदारीने पूर्ण होणारी नाहीत. तसेच शासनाने जाहीर केलेल्या भत्त्यात कंत्राटी कर्मचारी मिळणे आणि ते टिकणे अशक्मय होणार आहे. त्यामुळे या एक दिवशीय निषेध आंदोलनात जिल्हय़ातील सर्व अनुदानित, अंशतः अनुदानित, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा चालविणाऱया संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सामंत आणि सचिव योगेश राऊळ यांनी केले आहे.
या आंदोलनाला शिक्षक भारतीचा पाठिंबा असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी दिली.