प्रतिनिधी / बार्शी
कोरोना विषाणूची लढाई संपूर्ण देशभर आज आपले भारतीय नागरिक लढताहेत. आपल्या गावापासून ते दिल्ली पर्यंत सर्व प्रकारच्या यंत्रणा कोरोनाचे रुग्ण कमी व्हावे यासाठी अविरत प्रयत्नशील आहेत. आरोग्य खाते, पोलीस खाते स्थानिक स्वराज्य संस्था व शासन प्रत्येक नागरिकांची काळजी घेण्यामध्ये तत्पर आहेत. कोरोनाचे संकट नक्कीच दूर होईल हा आत्मविश्वास आता भारतातील प्रत्येक नागरिकास सरकारलाही वाटत आहे. एखाद्या नागरिकास घसा दुखणे, कोरडा खोकला अशी अनेक लक्षणे आढळल्यास त्यास कोरोनाची बाधा झाली आहे. असे निश्चित करण्यात येते.
मात्र हे निश्चित करत असताना त्या व्यक्तीच्या शरीरामधील ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे. हे पाहणे गरजेचे असते. जर त्या व्यक्तीची ऑक्सिजन लेव्हल चांगल्या प्रकारे असेल तर त्या व्यक्तीस दवाखान्यात दाखल न करता कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येते. मात्र ऑक्सिजन मोजण्याची मशीन जर अचूकपणे ऑक्सिजन दाखवत नसेल तर पुढील निदान कसे करायचे हा मोठा प्रश्न असतो. या विषयी ऑक्सिजन मोजणारे ऑक्सी मीटर नावाचे छोटे यंत्र आज बाजारामध्ये उपलब्ध आहे. त्याच्याविषयी दैनिक तरुण भारत संवादने माहिती जाणून घेतली आणि निष्कर्ष अंती काही ऑक्सीमीटर असे निघाले की ते मानवी शरीराचे ऑक्सिजन तर तपासतताच परंतु चक्क निर्जीव वस्तूंचे ही ऑक्सिजन तपासतात.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मानवी शरीरामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जर 94 टक्के पेक्षा जास्त असेल तर तो माणूस सुदृढ आहे. असे समजले जाते. कोरोना बाधित व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्या व्यक्तीस केअर सेंटरमध्ये दहा दिवस अलगीकरण करण्यात येते आणि जर त्या व्यक्तीचे शरीरामधील ऑक्सिजन कमी होत असेल तर त्या व्यक्तीला कृत्रिम मार्गाने ऑक्सिजन पुरवठा करण्यात येतो. मात्र त्या व्यक्तीच्या शरीरामधील ऑक्सिजनचे प्रमाण मोजणारे यंत्र जर चुकीची माहिती सांगू लागले तर खूप मोठ्या अडचणी त्या रुग्णास पुढे येऊ शकतात. या बाबत एकाच व्यक्तीचे ऑक्सिजनचे प्रमाण विविध ठिकाणी वेगवेगळे येते हे निदर्शनास आल्यानंतर तरुण भारत संवाद ने या विषयी थोडी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
तरुण भारत संवाद बार्शी प्रतिनिधीने स्वतः आपल्या शरीरातील ऑक्सिजन तपासले, यात काही दवाखाने, काही शासकीय यंत्रणा, कार्यालयांमध्ये, बाजारामध्ये अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांकडे असणाऱ्या ऑक्सिजन यंत्रातून ऑक्सिजनची तपासणी केली. सर्व ठिकाणी ऑक्सिजनचे प्रमाण वेगवेगळे आले. या छोट्या ऑक्सी मीटर या यंत्रामध्ये जसे ऑक्सिजन तपासले जाते तसेच आपल्या हृदयाचे ठोकेही तपासले जातात विविध ठिकाणी तपासणी केल्यानंतर लक्षात आले की एकाच वेळी अनेक ठिकाणी तपासल्यानंतर हृदयाचे ठोके हे बदलत आहेत, आणि ही बदलणे सहाजिक असते कारण त्यावेळची शारीरिक परिस्थिती वेगळी असते. मात्र शरीरातील ऑक्सिजनची आकडेवारी मात्र खूप विदारक समोर येत होती. सर्व ठिकाणी वेगवेगळी आकडेवारी येत होती फक्त दवाखान्यांमध्ये असणाऱ्या ऑक्सिमीटरच्या मशीनमध्ये आकडेवारी जुळत होती. मात्र खाजगी ठिकाणी असणाऱ्या ऑक्सि मीटरमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी जास्त होत होते.
यावरून निष्कर्ष निघतो की ऑक्सीमीटर नावाचे बाजारात मिळणारे यंत्र हे बनावट मिळत आहे. त्यानंतर त्या चौकशी मीटरमध्ये मानवी बोट न टाकता काही निर्जीव वस्तू टाकून पाहिल्या तर त्याही वस्तूंचे ऑक्सिजन या ऑक्सिमीटरने दाखवले ज्यात पेन, पेन्सिल आणि चावी ठेवून पाहिली तर त्याचे ऑक्सिजन लेवल अनुक्रमे 86, 129 आणि 120 असे दाखवले. जर निर्जीव वस्तूला ऑक्सिजन लेवल दाखवत असेल तर याची खात्री कशामुळे करावी की हे योग्यच आहे. याबाबत काही डॉक्टरांना दूरध्वनीद्वारे विचारले असता त्यांनी सांगितले की एखाद्यावेळेस कंपनांमुळे निर्जीव वस्तूचे पल्स दाखवले तर मान्य झाले असते परंतु ऑक्सिजन दाखवणे योग्य नाही. त्यामुळे जर निर्जीव वस्तूला अक्सिजन ऑक्सिमीटर दाखवत असेल तर त्या ऑक्सिमीटर विषयी शंका निर्माण होणारी आहे. त्यामुळे बाजारामध्ये मिळणारे ऑक्सी मीटर हे नक्कीच तपासून घेतले पाहिजे तर अधिकृत आणि मान्यता प्राप्त कंपन्यांचे असणारे ऑक्सी मिटर घेणे कधीही चागले.