वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
जागतिक मानव विकास निर्देशांकात (एचडीआय) यंदा भारताचे स्थान 3 अंकांनी घसरले आहे. एचडीआयमध्ये भारत 188 देशांच्या यादीत 131 व्या स्थानी राहिला आहे. मागील वर्षी भारत यात 129 क्रमांकावर होता. एचडीआयच्या यादीत पाकिस्तानला 154 वे स्थान मिळाले आहे. संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रमाद्वारे (युएनडीपी) प्रसिद्ध या निर्देशांकात नॉर्वे पहिल्या स्थानावर आहे. तर आयर्लंड आणि स्वीत्झर्लंड अनुक्रमे दुसऱया आणि तिसऱया स्थानावर आहेत.
भारताचे ग्रॉस नॅशनल इन्कम (जीएनआय) दरडोई क्रयशक्ती समानता (पीपीपी) 2018 मधील 6829 डॉलर्सवरून 2019 मध्ये 6681 डॉलर्सवर आली आहे. 2020 च्या या अहवालानुसार 2019 मध्ये भारतीयांचे सरासरी आर्युमान 69.7 वर्षे होते, बांगलादेशात हाच आकडा 72.6 तर पाकिस्तानात 67.3 इतका होता.
भूतान, श्रीलंका सरस
भूतान आणि श्रीलंका हे देश देखील या निर्देशांकात भारताच्या पुढे आहेत. श्रीलंका 72 व्या तर भूतान 129 व्या स्थानावर आहे. भारत, भूतान बांगलादेश (133), नेपाळ (142) आणि पाकिस्तानला मध्यम मानव विकास असलेल्या देशांमध्ये स्थान देण्यात आले आहे.
1990 ते 2019 पर्यंत विकास
2019 साठी भारताचे एचडीआय मूल्य 0.645 असून देशाचा समावेश मध्यम मानव विकास शेणीत करण्यात आला आहे. 1990 ते 2019 दरम्यान भारताचे एचडीआय मूल्य 0.429 ने वाढून 0.645 वर पोहोचले आहे. 1990 ते 2019 यादरम्यान भारतीयांचे आर्युमान 11.8 वर्षांनी वाढले आहे. तर शालेय शिक्षणाच्या स्तरातरही मोठी प्रगती झाली आहे. भारताचे दरडोई जीएनआय 1990 ते 2019 या कालावधीत सुमारे 273 टक्क्यांनी वाढल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.