जिल्हा रुग्णालयातील प्रकार
प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हा रुग्णालयात मनोरुग्णांवरील उपचारासाठी मानसोपचार विभागात जिल्हा मानसोपचार वैद्यकीय अधिकारी हे अतिशय महत्वाचे पद रिक्त असल्याने मनोरुग्णाचे व त्यांचे नातेवाईकांचे अतोनात हाल होत आहेत. रुग्णालयात तातडीने मानसोपचार तज्ञांची नियुक्ती करावी, अशी मागणी सातारा जिल्हा महात्मा फुले युवा दलाचे अध्यक्ष ऍड. धनंजय फरांदे यांनी केली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱयांमार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात ऍड. फरांदे यांनी म्हटले आहे की, जिल्हा रुग्णालयात मानसोपचार तज्ञ नसल्याने मोठी समस्या निर्माण झालीय. तसेच जिल्हय़ातील गंभीर मनोरुग्णांना उपचारासाठी पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यासाठी जिल्हा मानसोपचार वैद्यकीय अधिकाऱयाचा वैद्यकीय दाखल मिळत नाही. सातारा जिल्हा मानसोपचार वैद्यकीय अधिकारी हे पद रिक्त असल्याने जिल्हय़ातील मनोरुग्णांना तसा दाखला मिळवण्यासाठी पुण्यातील ससुन हॉस्पीटलमधील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे तपासणीकामी दाखल करून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळण्यासाठी यातायात करावी लागत आहे.
त्यामध्ये मनोरुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची प्रचंड गैरसोय होत असून त्यांना या सर्व प्रकाराचा त्रास होत आहे. सध्या कोविड-19 चा घटता प्रभाव पाहता मनोरुग्णांचे हाल थांवविण्यासाठी व त्यांना तातडीने शासकीय स्तरावर उपचार मिळण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. त्यासाठी जिल्हयातील खाजगी अथवा शासकीय मानसोपचार विभागात काम करणाया तज्ञ डॉक्टरांची नेमणुक करून अथवा त्यांना अतिरिक्त कार्यभार सोपवून मनोरुग्ण व नातेवाईकांची परवड थांबवावी, अशी मागणी ऍड. फरांदे यांनी केली आहे.