निमंत्रितांची महिला फुटबॉल स्पर्धा
प्रतिनिधी /बेळगाव
हल्याळ येथे उत्तर कन्नड जिल्हा फुटबॉल संघटना व कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निमंत्रितांच्या 9 ए साईड महिलांच्या फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेळगावच्या मानस स्पोर्ट्स फुटबॉल अकादमी संघाने जॉईस युनायटेड बेंगळूर संघाचा टायब्रेकरमध्ये 4-3 असा पराभव करून हल्याळ चषक पटकाविला.
या फुटबॉल स्पर्धेत 8 संघानी भाग घेतला होता. बेंगळूर, मंगळूर, धारवाड, हल्याळ व बेळगाव येथील संघांचा त्यात समावेश होता. मानस फुटबॉल अकादमी संघाने पहिल्या सामन्यात विद्यानिकेतन एफसी संघाचा 1-0 असा पराभव केला. तन्वी गावडेने एकमेव गोल केला. दुसऱया सामन्यात मानस संघाने जनगा रॉकर्स संघाचा 7-0 असा पराभव केला. धनश्री कदमने 4, तन्वी गावडेने 2, अपर्णा हरेरने 1 गोल केला. उपांत्यपूर्व सामन्यात जॉईस युनायटेड बेंगळूर संघाकडून मानस अकादमीला 2-0 असा पराभव पत्करावा लागला. सरस गोलसरासरीच्या आधारावर मानस अकादमीने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
उपांत्य फेरीत मानस अकादमीने मंगळूर एफसीवर 1-0 असा निसटता विजय मिळविला. या सामन्यात धनश्री कदमने एकमेव गोल केला. अंतिम सामन्यात मानस अकादमीने जॉईस युनायटेड बेंगळूर संघाचा टायबेकरमध्ये 4-3 असा पराभव केला. मानस अकादमीतर्फे प्रेरणा बेन्नी, धनश्री कदम, तन्वी गावडे, सायली कदम यांनी गोल केले.
सामन्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या मानस अकादमी संघाला व उपविजेत्या जॉईस युनायटेड बेंगळूर संघाला चषक, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून धनश्री कदम, उत्कृष्ट डिफेंडर म्हणून सायली देसाई तर उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून पल्लवी चौगुले यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.