बेळगाव : मानस स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फौंडेशन आयोजित फॅन्को चषक सेव्हन ए साईड फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मानस स्पोर्ट्स डेव्हलपमेंट संघाने स्पोर्टांग प्लॅनेट संघाचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव करून फॅन्को चषक पटकाविला.
बालिका आदर्श येथील बीटा टर्फ फुटबॉल मैदानावर आयोजित या फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना मानस स्पोर्ट्स फौंडेशन संघ व स्पोर्टींग प्लॅनेट या संघात झाला. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने गोलफलक कोराच राहिला. दुसऱया सत्रात 10 व्या मिनिटाला मानस अकादमीच्या दक्ष मुळेने गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर स्पोर्टींग प्लॅनेट संघाने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण मानस स्पोर्ट्स संघाच्या बचाव फळीपुढे त्यांचे प्रयत्न असफल ठरले. शेवटी हा सामना मानस स्पोर्टस् फौंडेशन संघाने 1-0 असा जिंकला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे फॅन्कोचे संचालक सलिम फनिबंद व जुबेर चौधरी यांच्या हस्ते विजेत्या मानस स्पोर्ट्स फौंडेशन संघाला व उपविजेत्या स्पोर्टींग संघाला चषक व प्रमाणपत्र, सर्व खेळाडूंना पदके देऊन तर स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून दक्ष मुळे (मानस अकादमी), उत्कृष्ट डिफेंडर आराध्या नाकाडी (स्पोर्टींग प्लॅनेट) यांना चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रशिक्षक विशाल कामू, आदित्य एच., लियांड्रो कार्वालो, राहुल मगदूम, कौशिक पाटील आदी उपस्थित होते.