1 जून रोजी मान्सून कोकण किनारपट्टीला धडकणार
पुणे
नैऋत्य मोसमी वाऱयांना (मान्सून) पोषक स्थिती निर्माण झाली असून, सोमवारी मान्सून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने रविवारी व्यक्त केला. देवभूमी केरळातही अनेक ठिकाणी पावसाला सुरूवात झाली असून, हवामान विभागाने दक्षतेचा इशारा दिला आहे.
सद्यःस्थितीत मान्सूनच्या वाटचालीत कोणताच अडथळा नाही. त्यामुळे मान्सून वेगाने पुढे सरकत आहे. 27 मे रोजी मान्सून केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. केरळातून मान्सून वेगाने महाराष्ट्राची वाटचाल करणार आहे. त्यामुळे 1 जून रोजी मान्सून कोकण किनारपट्टीला धडकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मागील चार दिवसांपासून अंदमान समुद्रावर पावसाळी वातावरण आहे. अंदमान परिसरातही पाऊस कायम आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी अंदमानात मान्सून दाखल होऊ शकतो.
केरळातील एर्नाकुलम शहरातील बहुतांश भागात रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलमय झाला होता. अनेक जिह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केल्यामुळे, राज्य सरकार आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने लोकांना नद्या आणि इतर जलकुंभांपासून दूर राहण्यास सांगितले आहे. तसेच, नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमुळे डोंगराळ प्रदेशात प्रवास करू नये आणि पाऊस कमी होईपर्यंत रात्रीचा प्रवास टाळण्याच्या सूचना केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या दक्षिण भागात पाऊस पडत असल्याने, जिल्हा प्रशासनाने सखल भागात, नद्यांच्या काठावर आणि डोंगराळ भागात राहणार्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
पाच जिह्यांत अतिदक्षतेचा इशारा
मान्सून आगमनापूर्वीच केरळमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. आज (सोमवारी) केरळमधील एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर, मलप्पुरम आणि कोझिकोड जिह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. नैर्ऋत्य मान्सूनच्या अपेक्षित सुरुवातीच्या कालावधीत हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. रेड अलर्ट 24 तासांत 20 सेंमीपेक्षा जास्त मुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस दर्शविते, तर ऑरेंज अलर्ट म्हणजे 6 सेंमी ते 20 सेंमीपर्यंत अतिवृष्टी. पिवळा इशारा म्हणजे 6 ते 11 सेंमी दरम्यान मुसळधार पाऊस.
राज्यात मेघगर्जनेसह पाऊस
मान्सून आगमनामुळे राज्यातील वातावरणात बदल झाला आहे. पुढील आठवडाभर राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोकण, गोव्यात पाऊस असेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मात्र मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात जोरदार ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मागील 24 तासांत गोव्यात पाऊस पडला. राज्यात कोरडे हवामान होते. राज्यात वर्धा येथे उच्चांकी 46.5 अंश कमाल तपमानाची नोंद झाली.