नगराध्यक्षा पूजा नाईक यांचे स्पष्टीकरण : राहिल्यास दूर करू
प्रतिनिधी / मडगाव
मान्सूनपूर्व गटारांची साफसफाई करण्याची कामे असोत वा प्रभागवार विकासकामे, त्यात कोणत्याही त्रुटी नाहीत. तरीही काही त्रुटी राहून गेलेल्या असल्यास पालिकेचे अभियंते त्या दूर करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे ही सर्व कामे पावसाळय़ापूर्वी मार्गी लागतील, अशी माहिती मडगावच्या नगराध्यक्षा पूजा नाईक यांनी दिली.
शॅडो कौन्सिल फॉर मडगावने वरील दोन्ही प्रकारच्या कामांसंदर्भात त्रुटी काढून खास करून सुमारे अडीच कोटींच्या कामांमध्ये घोटाळा असल्याचा आरोप केला होता. याबाबत विचारणा केली असता नगराध्यक्षांनी वरील प्रतिक्रिया दिली. सदर कामांच्या निविदा काढण्यात त्रुटी राहून गेल्यास अभियंते सर्वेक्षण करतील आणि काही त्रुटी आढळल्यास त्या सुधारून कामे मार्गी लावण्यात येतील. पावसाळा एका महिन्यावर पोहोचलेला असल्याने त्वरित ती कामे मार्गी लागणे आवश्यक असल्याचे त्यांनी नजरेस आणून दिले. दिनीज डिमेलो यांनी विशेष प्रयत्न करून या निविदा तयार केल्या होत्या. त्यांची बदली झाली असली, तरी नवीन पालिका अभियंता सुरेंद्र गावकर यांना घेऊन कामे मार्गी लावली जातील, असे नगराध्यक्षा नाईक यांनी सांगितले.
दरम्यान, सोनसडा येथील कचऱयाच्या ढिगाऱयांवर बायोरेमिडिएशन प्रक्रिया केल्यावर राहून जाणारी टाकावू भुकटी टाकण्यासाठी पालिकेने जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने पालिकेकडे जागा देण्यासाठी दोन-तीन वेळा पत्रव्यवहार केला असला, तरी त्यास प्रतिसाद दिलेला नाही. याकडे नगराध्यक्षांचे लक्ष वेधले असता आपण यासंदर्भात मुख्याधिकाऱयांना आवश्यक सूचना केल्याचे नाईक यांनी सांगितले.