पुणे/ प्रतिनिधी
नैऋत्य मोसमी वाऱयांना (मान्सून) भारतीय भूमीत येण्यासाठी विलंब होणार असून, केरळातील 1 जूनचा मुहूर्त चुकवित 3 जूनला मान्सून केरळात दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने रविवारी दिली.
दरवर्षी साधारणपणे 1 जूनच्या आसपास मान्सून केरळात दाखल होतो. भारतीय हवामान विभागाने यंदा 31 मे रोजीच मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज वर्तविला होता. मात्र, मान्सूनने हुलकावणी दिली आहे. केरळात 1 जूनपासून पावसाचा प्रभाव वाढणार असून 3 जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची नव्याने शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान 21 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल झाला असून, त्याने अंदमान निकोबार बेटे, मालदीव कॉमेरुन बेटांसह बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला आहे.
महाराष्ट्र–गोवा–कर्नाटकात पाऊस
पुढील दोन दिवस महाराष्ट्र, गोवा कर्नाटकात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.