जेलेंस्की यांचा झुकण्यास नकार : युद्धात अत्याचार करणाऱया सर्वांना शिक्षा मिळणार
रशिया-युक्रेन युद्धाचा सोमवार हा 12 वा दिवस होता. युक्रेनवर रशियाच्या सैन्याकडून मोठय़ा प्रमाणात हल्ले होत आहेत. यामुळे युक्रेमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. तर युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर जेलेंस्की यांनी युद्धासाठी जबाबदार लोकांना शिक्षा मिळवून देण्याची शपथ घेतली आहे.
ही हत्या आहे, जाणूनबुजून करण्यात आलेली हत्या आहे. रशियाने सोमवारी आणखीन अनेक गोळीबार करण्याची धमकी दिली आहे. परंतु आम्ही हे युद्ध कधीच विसरणार नाही आणि यात सामील लोकांना माफ देखील करणार नाही. आम्ही आमच्या भूमीवर अत्याचार करणाऱया सर्व लोकांना शिक्षा करू असे उद्गार जेलेंस्की यांनी काढले आहेत.
रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या शहरांना उद्ध्वस्त केले आहे. युद्धविरामादरम्यान देखील बॉम्बवर्षाव थांबला नाही. यामुळे मारियुपोलमध्ये अडकून पडलेले लोक बाहेर पडू शकले नाहीत असा दावा जेलेंस्की यांनी केला आहे.
अमेरिकेकडून आणखीन निर्बंध युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर अनेक देश ब्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आले आहेत. युरोपसोबत रशियाच्या कच्चे तेल आयातीवर बंदी घालण्याची चर्चा सुरू असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. तर नाटोने युक्रेनच्या नो-फ्लाय झोनचा प्रस्ताव फेटाळला आहे. युक्रेनचा प्रस्ताव मान्य केल्यास तिसरे महायुद्ध होऊ शकते. कारण पुतीन यांनी नो फ्लाय झोन लागू झाल्यास युरोपच नव्हे तर पूर्ण जगाला विध्वंसक परिणाम भोगावे लागणार असल्याची धमकी दिली असल्याचे अमेरिकेतील खासदार मार्को रुबियो यांनी म्हटले आहे.