प्रतिनिधी /पणजी
माजी मंत्री व कळंगुटचे काँग्रेस उमेदवार मायकल लोबो यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली आणि गोव्यातील काँग्रेसच्या सरकार स्थापनेबाबत चर्चा केली. विधानसभा निवडणुकीत गोव्यात काँग्रेस पक्षाला बहुमत मिळणार असल्याचा दावा श्री. लोबो यांनी वेणुगोपालकडे केला असून काँग्रेसच्या श्रेष्ठींनी गोव्याकडे लक्ष द्यावे अशी सूचना त्यांना केल्याची माहिती मिळाली आहे.
मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 17 जागा मिळूनदेखील सरकार स्थापनेचा दावा करण्यास व प्रत्यक्ष सरकार घडवण्यास काँग्रेस पक्षाला अपयश आले याची जाणीव श्री. लोबो यांनी वेणुगोपालना करून दिली. तशी चूक यावेळी होता कामा नये. बहुमतासाठी जर आकडा कमी पडत असेल तर अपक्ष किंवा इतर पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा घेवून सरकार घडवण्यासाठी आतापासूनच तयारी करण्याची गरज श्री. लोबो यानी वर्तवली.
यावेळी भाजपासोबत इतर पक्ष किंवा अपक्ष आमदार जाणार नाहीत कारण ते भाजपामुळे दुखावलेले आहेत. ते काँग्रेससोबत येतील व सरकार करतील. काँग्रेसला बहुमत मिळाणारच असा दावाही श्री. लोबो यांनी वेणुगोपालकडे केला आहे.