वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आपली बेधडक मते तितक्याच रोखठोकपणे मांडण्यासाठी ओळखल्या जाणाऱया विंडीजच्या मायकल होल्डिंग यांनी बुधवारी समालोचनातून आपण निवृत्त होत असल्याची घोषणा केली. मागील दोन दशकांपासून स्काय स्पोर्ट्स समालोचन पथकात त्यांचा प्राधान्याने समावेश राहिला. या हंगामाअखेर आपण निवृत्त होत असल्याचे ते याप्रसंगी म्हणाले.
एकवेळ क्रिकेटमधील तेजतर्रार गोलंदाजांमध्ये आवर्जून स्थान संपादन करणाऱया होल्डिंग यांनी 1975 ते 1987 या कालावधीत विंडीजतर्फे 60 कसोटी व 102 वनडे सामने खेळले आहेत. ‘व्हिस्परिंग डेथ’ या नावाने त्यांनी विशेष ओळख प्राप्त केली.
होल्डिंग यांनी 1988 मध्ये कॅरेबियन भूमीत समालोचनाचा श्रीगणेशा केला. प्रत्यक्ष खेळत असतानाचा रुबाब त्यांनी समालोचनातही कायम राखला. 66 वर्षीय होल्डिंग यांनी आपली मते रोखठोकपणे मांडण्यात कधीही कसर सोडली नाही. बऱयाच बाबतीत ते ठाम राहिले आणि प्रथमश्रेणी टी-20 ला क्रिकेट मानत नसल्याने अशा स्पर्धांमध्ये त्यांनी कधीही समालोचन केले नाही.
गतवर्षी जॉर्ज फ्लॉईडच्या हत्येनंतर ब्लॅक लाईव्ज मुव्हमेंट सुरु झाली, त्यावेळी होल्डिंग यांनी यावरुन उठवलेला आवाज लक्षवेधी ठरला. वर्णभेद व असमानतेच्या मुद्यावरील त्यांची मते अनेकांची मने जिंकणारी ठरली. या भूमिकेवरुनच युकेमधील 2 ब्रॉडस्कास्ट पुरस्काराचे ते मानकरी ठरले. खेळातील वर्णभेदावर आधारित लिखित ‘व्हाय वुई नील, हाऊ वुई राईज’, हे त्यांचे पुस्तकही बरेच गाजले.
2010 च्या हंगामात मोहम्मद असिफ व मोहम्मद आमीर यांच्या गोलंदाजीची त्यांनी सातत्याने प्रशंसा केली. पण, हीच जोडी पुढे लॉर्ड्स कसोटीत स्पॉट फिक्ंिसगच्या वादळात अडकली, त्यावेळी होल्डिंग यांनी त्याबद्दल खंतही नोंदवली. अवघ्या 18 वर्षांचे गोलंदाज मॅच फिक्ंिसगच्या जाळय़ात अडकतात, हे पचवता येण्यासारखे नाही, असे ते स्पष्टपणे म्हणाले होते.
एरवी, कारकिर्दीनंतर समालोचनाकडे वळलेले समालोचक तटस्थ सामन्यात समालोचन करण्यास फारसे उत्सुक असत नाहीत, असा सार्वत्रिक प्रवाह असताना होल्डिंग मात्र त्याला अपवाद ठरले. अलीकडेच इंग्लंड-भारत यांच्यातील कसोटी मालिकेतही होल्डिंग यांनी समालोचन केले. मात्र, आपण निवृत्तीच्या उंबरठय़ावर असल्याचे त्यांनी त्यावेळी देखील काही वेळा आवर्जून सांगितले होते.
समालोचनात मायकल होल्डिंग यांची जागतिक स्तरावर प्रकर्षाने उणीव भासत राहील. ब्रॉडकास्टिंगमधील देदीप्यमान कारकिर्दीबद्दल त्यांचे खास अभिनंदन. आपण तटस्थपणे, समतोल मत मांडत राहिला, ते लक्षवेधी होते.
-माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर