वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगभरामध्ये एकेकाळी नंबर वन सर्च इंजिन म्हणून याहूची गणना होत होती. पण गुगलने हळुहळु आपला व्यवसाय अधिक जोमाने विकसित करत या क्षेत्रामध्ये मोठी मजल मारली. याहू या व्यवसायामध्ये खूप मागे पडली. आता मायक्रोसॉफ्टने एक पाऊल पुढे टाकत याहूची खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. याकरिता कंपनी 3.3 लाख कोटी रुपये देण्यासाठी तयार झाली असल्याचे समजते.
सदरचा व्यवहार पूर्ण झाल्यास या दोन्ही कंपन्या गुगलला चांगल्याच जड जातील, असा अंदाज तज्ञांकडून वर्तविला जात आहे. याहूचे संचालक मंडळ सदरच्या ऑफरबाबत विचार विनिमय करत असल्याचे सांगण्यात आले. अंदाजे याहूचे 70 कोटी वापरकर्ते आहेत. मायक्रोसॉफ्टने ही ऑफर काही पहिल्यांदाच दिलेली नाही. याआधीसुद्धा म्हणजेच 2008 मध्ये यासाठी कंपनी प्रयत्नरत होती. सदरच्या व्यवहारासंदर्भात मायक्रोसॉफ्टने याहूच्या मंडळाला (बोर्ड) एक पत्रही लिहिले आहे. जर का हा व्यवहार झाला तर याहूच्या समस्त वापरकर्त्यांना अनेक फायद्यांचा लाभ येणाऱया काळामध्ये उठविता येणार आहे.
बातम्या, वित्त आणि क्रीडा प्रकारात दबदबा
याहू या पोर्टलवर 50 कोटी वापरकर्ते दर महिन्याला बातम्या, वित्तसंबंधीत माहिती आणि क्रीडा बातम्याशी संबंधित घडामोडींवर लक्ष ठेवत असतात. गुगल ही इंटरनेट विश्वामध्ये सर्वात आघाडीवरची कंपनी ठरली आहे. गुगल सर्च इंजिनपासून ते स्मार्ट फोनच्या अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमवर गुगल नियंत्रण ठेवत आहे. अधिकतर लोक गुगलच्या ऍप्सचा आणि सॉफ्टवेअरचा पूर्णपणे वापर करताना दिसतात. मायक्रोसॉफ्टची ऑफर याहूकडून मान्य होते का हे लवकरच समजू शकेल.