वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगातील दिग्गज सॉफ्टवेअर निर्मितीमधील कंपनी मायक्रोसॉफ्ट येत्या काळात नोएडामध्ये 80 हजार चौरसमीटरमध्ये प्रकल्पाची उभारणी करणार असल्याची माहिती आहे. नोएडामधील विकास प्राधिकारणाचे मुख्य अधिकारी ऋतू महेश्वरी यांनी सदर जमिनीची किंमत जवळपास 103 कोटी रुपये असल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे.
कंपनीच्या या नवीन प्रकल्पामध्ये जवळपास हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याची माहिती महेश्वरी यांनी दिली असून आगामी काळात अन्य सॉफ्टवेअर कंपन्या नोएडाकडे आकर्षित होणार असल्याचा मुद्दाही नमुद केला आहे.
मागील काही दिवसांपासून चर्चा
नोएडामध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनी आपला प्रकल्प उभारणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु राहिली होती. परंतु या घोषणेमुळे सदरच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. योजनेच्या अटींसोबत मात्र 40 टक्के रक्कम ही एक महिन्याच्या आतमध्ये द्यावी लागणार असल्याने बाकी 60 टक्के रक्कम ही आठ सहामाहीपर्यंत द्यावी लागणार असल्याची बाब कंपनीने सांगितली आहे.