भारताचा बुद्धिबळ जगज्जेता विश्वनाथन आनंदची प्रतिक्रिया
@ चेन्नई/ वृत्तसंस्था
भारताचा पाच वेळचा बुद्धिबळ विश्वविजेता विश्वनाथन आनंद अखेर मायभूमीत दाखल झाला असून मायभूमीत परतल्याचा आनंद वेगळा आहे, अशी प्रतिक्रिया त्याने येथे दिली. 50 वर्षीय विश्वनाथन आनंद लॉकडाऊनच्या कालावधीत जर्मनीत होता आणि नंतर प्रवासावर निर्बंध लादले गेल्यानंतर त्याला तिथेच थांबावे लागले. भारतात बेंगळूरमध्ये दाखल झाल्यानंतर तो हॉटेल ताजमध्ये क्वारन्टाईन होता. हा कालावधी पूर्ण केल्यानंतर त्याने चेन्नईकडे कूच केली.
आनंद मार्चमध्ये चेस बुंदेस्लिगा स्पर्धेसाठी जर्मनीत होता. मात्र, स्पर्धा पूर्ण होता होता प्रवासावर निर्बंध सुरु झाले. आनंद आता चेन्नईतील आपल्या निवासस्थानी दोन आठवडय़ांकरिता होम क्वारन्टाईन असेल. घरी परतल्याचा खास आनंद आहे, असे ट्वीट त्याने शनिवारी केले.
ताज हॉटेलमधील आपल्या वास्तव्याचा त्याने येथे खास उल्लेख केला. ‘ताजचा मी विशेष आभारी आहे. तेथील अनुभव अतिशय सुखद होता. अगदी वैद्यकीय चाचणी व स्क्रीनिंग देखील तत्परतेने केले गेले. ताजचे आदरातिथ्य नेहमीच लक्षात राहील’, असे आनंद ट्वीटमध्ये पुढे म्हणाला.
दरम्यान, आनंदसमवेत त्याच फ्लाईटमध्ये असणारा एक चाहता देखील हॉटेल ताजमध्ये आनंदसमवेतच क्वारन्टाईन होता. या चाहत्याने शेअर केलेल्या फोटोत आनंद व तो एका अंतरावर असल्याचे दिसून आले.
पद्मविभूषण विश्वनाथन आनंद जिनियस खेळाडू आहे. तो सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे आणि याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्याचे पाय जमिनीवर आहेत. आम्ही जर्मनीपासून भारतापर्यंत एकत्रित प्रवास केला. पण, या सर्व कालावधीत त्याने आपल्याला विशेष महत्त्व दिले जावे, अशी त्याने अपेक्षाही केली नाही. विमानतळावर, वैद्यकीय चाचणीच्या वेळी तो रांगेतच उभा राहिला. याआधी पासूनच मी आनंदचा चाहता आहे. या अनुभवानंतर त्याच्याप्रती माझा आनंद आणखी वाढला आहे’, असे त्या चाहत्याने नमूद केले.
जर्मनीत आनंदचे वास्तव्य प्रँकफर्टनजीक होते आणि कॅन्डिडेटस स्पर्धेसाठी तो ऑनलाईन समालोचन देखील करत होता. अर्थात, ती स्पर्धा कोव्हिड-19 च्या प्रकोपामुळे मध्यातच रद्द केली गेली. त्यानंतर या महिन्याच्या प्रारंभी आनंदने ऑनलाईन नेशन्स चषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व भूषवले. जर्मनीत अडकून रहावे लागल्यानंतरही आनंद सातत्याने व्हीडिओ कॉलच्या माध्यमातून आपल्या कुटुंबियांशी संपर्कात राहिला. या कालावधीत त्याने बुद्धिबळविषयक बाबीत स्वतःला व्यस्त ठेवले.