ऑनलाईन टीम / जिनेव्हा :
जगभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असतानाच आणखी एका विषाणूने डोके वर काढले आहे. पश्चिम आफ्रिकेतील गिनीमध्ये ‘मारबर्ग’ या घातक विषाणूचा संसर्ग झाल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा विषाणू कोरोनापेक्षाही घातक असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे क्षेत्रीय निर्देशक डॉक्टर मात्शिदिसो मोएती म्हणाले, पश्चिम आफ्रिकेतील गिनीमध्ये मारबर्ग विषाणूचा संसर्ग झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाला आहे. वटवाघळांमार्फत लागण होणाऱ्या या विषाणूमुळे मरण पावण्याचे प्रमाण 88 टक्के आहे. कारण मारबर्गचा संसर्ग झाल्यानंतर शरीरामधून उत्सर्जित होणारे पदार्थ हे बाहेरील प्रदुषित वातावरणात मिसळतात. त्यामुळे रुग्णाची प्रकृती खालावते आणि रुग्णावर योग्य उपचार करता येत नाहीत. मारबर्ग विषाणूच्या संसर्गाचा धोका क्षेत्रीय स्तरावर अधिक असून, जागतिक स्तरासंदर्भात धोका कमी असला तरी जागतिक आरोग्य संघटनेकडून खबरदारीचा इशारा देण्यात आलेला आहे.