बिबी / वार्ताहर :
हिंगणगाव-आदर्की रस्त्यावरील विठ्ठल बिरदेव मंदिराजवळ झालेल्या मारहाण प्रकरणी निंबोडी ता. खंडाळा येथील सरपंचासह ६ जणांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणंद पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार, संदीप बिराजी शेळके (रा. निंबोडी ता. खंडाळा) हे वडील बिराजी शेळके व चुलतभाऊ तानाजी सोमनाथ शेळके यांच्यासह हिंगणगाव येथे येत असताना संशयित गणेश सोपान शेळके याने फोन करून त्यांना हिंगणगाव येथील मंदिराजवळ थांबण्यास सांगितले व अर्ध्या तासात फिर्यादी थांबलेल्या जागी दोन चारचाकी गाड्यांमधून ५/६ जण खाली उतरले. त्यावेळी गणेश शेळके याने शिवीगाळ करत फिर्यादीला कानशिलात लगावली. त्यानंतर निंबोडी सरपंच सुजित अर्जुन शेळके, अमोल माणिक शेळके, नाना भिवाजी शेळके, मेघराज रंगराव शेळके, सुभाष सदाशिव शेळके यांनीही फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
सोबत असलेले फिर्यादी संदीपचे वडील बिराजी शेळके व चुलतभाऊ तानाजी शेळके हे सोडविण्यास आले असता त्यांनादेखील मारहाण केली. याप्रकरणी पोलीस नाईक ज्ञानदेव साबळे अधिक तपास करीत आहेत.