नाझोमी ओकुहारा, चेन युफेई, तई झू यिंग यांनाही सुवर्ण जिंकण्याची संधी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
स्पेनची आघाडीची बॅडमिंटनपटू कॅरोलिना मारिन एसीएल टियरमुळे बाहेर फेकली गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन महिला एकेरीचे सुवर्ण जिंकण्यासाठी पीव्ही सिंधूसह 4 महिला स्पर्धकांच्या आशाअपेक्षा पल्लवित झाल्या आहेत. यापूर्वी 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीपर्यंत धडक मारणाऱया पीव्ही सिंधूला मारिनकडूनच पराभव पत्करावा लागला होता. यंदा सुवर्ण जिंकत ती कसर भरुन काढण्याचा सिंधूचा प्रयत्न असणार आहे.
मागील आठवडय़ापर्यंत यंदाच्या महिला एकेरी बॅडमिंटन सुवर्णपदकासाठी कॅरोलिना मारिन हीच जेतेपदाची प्रबळ दावेदार म्हणून गणली जात होती. अलीकडील 5 पैकी 4 स्पर्धा जिंकत तिने आपला फॉर्म दाखवून दिला होता. मात्र, सरावादरम्यान डाव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे तिला ऑलिम्पिकमधून माघार घ्यावी लागली आणि साहजिकच, बॅडमिंटन महिला एकेरीतील सर्व समीकरणे बदलून गेली आहेत.
स्वतः कॅरोलिना मारिन आपल्या उजव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे 5 महिने बाहेर होती. त्यानंतर पुनरागमनात 5 स्पर्धा जिंकत तिने आपला फॉर्म मिळवला. मात्र, आता डाव्या गुडघ्याचे दुखणे बाहेर पडल्याने तिचा पुन्हा एकदा नाईलाज झाला आहे. मारिन डावखुरी असून यामुळे फटके मारताना तिचा डावा पाय मागे असतो व त्यावरच बऱयापैकी भार असतो. यामुळे, ऑलिम्पिकमध्ये धोका पत्करुन उतरल्यास डाव्या गुडघ्याची ही दुखापत चिघळण्याची जास्त शक्यता होती. मारिन तिहेरी वर्ल्ड चॅम्पियन असून तिने 5 वेळा युरोपियन चॅम्पियनशिपही जिंकली आहे.
आता यंदा टोकियो ऑलिम्पिकमध्ये पीव्ही सिंधूसाठी सुवर्ण जिंकण्याची नामी संधी असेल. शिवाय, तैवानची तई झू यिंग, जपानची ओकुहारा, अकाने यामागुची, चीनची चेन युफेई, हे बिंगीजाओ हे देखील स्पर्धेत असतील. याशिवाय, रॅटचनोक, पोर्नपोवी चोचूवोंग थायलंडला पहिलेवहिले सुवर्ण जिंकून देण्यासाठी प्रयत्नशील असतील. स्पेनचे पथक मारिनच्या गैरहजेरीत 6 फूट उंचीच्या कार्ला अझुरमेंडीला उतरवण्याची शक्यता आहे. कार्लाने रविवारीच ऑस्ट्रेलियन टायटलवर आपली मोहोर उमटवली आहे.