2500 नागरिक बॉम्बवर्षावात ठार ः उणे 5 अंश तापमानात लोक भूकेने व्याकुळ
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील मारियुपोल शहरात मोठा विध्वंस घडला आहे. बॉम्बवर्षावात 2500 हून अधिक नागरिकांनी जीव गमावला आहे. हा आकडा युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर जेलेंस्की यांचे सल्लागार ओलेक्सी एरेस्टोविच यांनी दिला आहे. मारियुपोलमधून धक्कादायक ड्रोन फुटेज आणि उपग्रहीय छायाचित्रे समोर आली आहेत. यात रशियाच्या बॉम्बवर्षावानंतर घडलेल्या विध्वंसाचे दृश्य दिसून येते.
शहरात सुमारे 3.5 लाख अडकून पडले आहेत. वीज, पाणी आणि औषधे यासारख्या आवश्यक गोष्टींशिवाय जगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. गॅसही मिळत नसल्याने उणे 5 अंश तापमानात जीव वाचविणे या लोकांसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.
सुमारे 2 हजार वाहनांमधून लोक शहराबाहेर पडण्यास यशस्वी ठरले आहेत. याचबरोबर 2 हजारांहू अधिक वाहने शहराबाहेर जाणाऱया महामार्गावर उभी आहेत. मारियुपोलला रशियाच्या सैनिकांनी 1 मार्चपासूनच घेरले आहे. येथून लोकांना बाहेर काढण्यासाठी सेफ्टी कॉरिडॉर तयार करण्यात आला, परंतु हा कॉरिडॉरही अधिक काळ उपयुक्त ठरू शकला नसल्याचे मारियुपोल सिटी कौन्सिलकडून म्हटले गेले.
सुमारे 225 किलोमीटर अंतरावरील जपोरिजिया भागात पलायन करण्यास यशस्वी ठरलेल्या महिलांना मारियुपोलमधील भयावह स्थितीबद्दल सांगितले आहे. रशियाचे बॉम्ब आमच्या घरांनजीक पडू लागल्याने आम्ही मारियुपोल सोडण्याचा निर्णय घेतल्याचे लिडिया म्हणाल्या.
आम्ही सुमारे 60 लोकांसोबत एका तळघरात दोन आठवडय़ांपर्यंत आश्रय घेतला. स्वतःच्या अपार्टमेंटमधून सामग्री आणण्यासाठी काहीवेळा बाहेर पडत होते. रशियाची विमाने अत्यंत कमी उंचीवरून उडत होती. आम्हाला सातत्याने हल्ल्याची भीती सतावत होती. याचमुळे अनेकवेळा थांबावे लागले आणि मुलांना लपवावे लागल्याचे लिडिया म्हणाल्या.
सुमारे 17 लोकांना स्वतःच्या घरात आश्रय दिला होता. पावसाचे पाणी जमा केले आणि त्यातून सूप तयार केले. युद्ध सुरू झाले तेव्हा मी शहर सोडू इच्छित नव्हते, परंतु 24 तास बॉम्बवर्षाव होऊ लागल्यावर तेथे राहणे अवघड झाल्याचे स्वितलाना यांनी सांगितले आहे.
अखेरचा ग्रॉसरी स्टोअर उद्ध्वस्त
माझा मुलगा मारियुपोलमध्येच आहे. मुलाबद्दल अत्यंत चिंतेत आहे, शहरात अद्याप अनेक लोक अडकून पडले आहेत. शहरातील अखेरच्या ग्रॉसरी स्टोअरवरही बॉम्बवर्षाव करण्यात आला होता असे 57 वर्षीय स्वितलाना यांनी म्हटले आहे.
रुग्णालयात लोक ओलीस
रशियाच्या सैनिकांनी मारियुपोलच्या रिजनल इंटेंसिव्ह केअर हॉस्पिटलमध्ये लोकांना ओलीस ठेवले आहे. डॉक्टर आणि रुग्णांना बळजबरीने रोखण्यात आल्याचे डोनेट्स्क रिजनल ऍडमिनिस्टेशनचे प्रमुख पावलो किरिलेंको यांनी म्हटले आहे. रुग्णालयातून बाहेर पडणे अवघड आहे. पलायन करणाऱयांना रशियाचे सैनिक त्वरित गोळय़ा घालतात. लोक तळघरात असून आमच्या चहुबाजूला उंच इमारतींनी पेट घेतला असल्याचे ते म्हणाले.