प्रतिनिधी/बेळगाव
घरची परिस्थिती हलाखीची, मात्र त्यावर मात करत वेगवेगळे टप्पे पार करत मारिहाळ गावच्या सुपुत्राने कर्नाटक लोकसेवा आयोग परीक्षेत ए ग्रुपमध्ये 33 वा क्रमांक पटकाविला. त्यानंतर त्याची सरकारने व्यावसायिक विभागाच्या उपायुक्तपदी नियुक्ती केली आहे. संतोष मल्लाप्पा किरगी असे त्या तरुणाचे नाव असून या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
संतोष किरगी (रा. मारिहाळ, ता. बेळगाव) याने गावातच दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 2001 मध्ये दहावीमध्ये 92 टक्के गुण मिळविले. त्यानंतर जीएसएस महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेत बारावीपर्यंत शिक्षण घेतले. बारावीनंतर केएलई इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये टेलिकम्युनिकेशनमधून पदवी मिळविली. त्याचवेळी त्याला अमेरिकन कार्टन्स इंजिनिअरिंग कंपनीमध्ये नोकरीत सामावून घेण्यात आले. बेंगळूर येथे काही दिवस नोकरी केली. त्यानंतर 2015 मध्ये अबकारी विभागात एक वर्ष उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावली. 2017 मध्ये कर्नाटक लोकसेवा आयोग परीक्षेत ग्रुप बी मधून तो उत्तीर्ण झाला. त्यामुळे त्याची साहाय्यक खजाना अधिकारी म्हणून नेमणूक झाली.
मात्र यावरच समाधान न मानता पुन्हा लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि ए गटातून 33 व्या क्रमांकाने तो उत्तीर्ण झाला. घरची परिस्थिती हलाखीची होती. वडील मल्लाप्पा शिवलिंग किरगी शेतकरी होते. त्यांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर आई शिवबसम्मा हिने त्याला साथ दिली. त्यामुळेच आपण आज हे यश संपादन केल्याचे संतोष याने सांगितले. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.