तंत्रज्ञानाच्या वापरातून विक्रीचे ध्येय : कोविड19 च्या नियमावलीचे पालन काटेकोर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील वाहन निर्मितीमधील दिग्गज कंपनी मारुती सुझुकीने लॉकडाऊनच्या कालावधीत मिळणाऱया काहीशा सवलतीचा आधार घेत आपली वाहन विक्री सुरु केली आहे. यामध्ये प्रथम वेगवेगळय़ा प्रकारचे धोरण आखून वाहन विक्रीवर भर दिला असून जवळपास 5000 कार्सची डिलिवरी ग्राहकांपर्यंत करण्यात कंपनीला यश आलं आहे.
कंपनीने लॉकडाऊनच्या तिसऱया सत्रामध्ये आपली शोरुम्स सुरु केली आहेत आणि याच कालावधीत देशातील सर्व डिलर्सना एकत्रित आणत ऑनलाईन प्लॅटफॉर्मची उभारणी केली आहे. याचा वापर करुन ग्राहकांना आपल्या पसंतीची कार घरबसल्या खरेदी करण्याची संधी मारुतीने उपलब्ध करुन दिली आहे. याचीही मोठी मदत वाहन विक्रीत तेजी निर्माण करण्यासाठी झाली असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
एसओपीवर भर
सध्याच्या काळात देशात मारुतीने 1350 शोरुम्स आणि 300 क्हॅल्यू आउटलेटस् सुरु केली आहेत. स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसीजरचा (एसओपी) वापर करुन कंपनी वाहन विक्री करण्यावर आगामी काळात भर देणार असून यात कोरोनाच्या काळातील आरोग्य विषयक नियमावलीचेही पालन करण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.