एका चार्जवर धावणार 400 ते 500 किमीपर्यंत ः किंमत 15 लाखापर्यंत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी ऑटो क्षेत्रातील कंपनी मारुती सुझुकी आपले पहिले इलेक्ट्रिक वाहन उतरवण्याच्या तयारीला लागली आहे. टोयोटा या आणखी एका ऑटो क्षेत्रातील कंपनीसोबत वायवाय-8 ही नवी इलेक्ट्रिक कार दाखल केली जाणार असल्याचे सांगितले जाते.
महत्त्वाचे म्हणजे ही कार एका चार्जवर तब्बल 400 ते 500 किलोमीटरचे अंतर पार करू शकणार आहे. जागतिक मध्यम आकाराची सुव्ह गटात मारुतीची नवी कार लाँच केली जाणार आहे.
इलेक्ट्रिक कार नेक्सनपेक्षा मारूती-टोयोटाची नवी गाडी आकाराने मोठी असेल, असेही म्हटले जात आहे. 48 केडब्ल्यूएच वा 59 केडब्ल्यूएचची बॅटरी यात असेल, असेही सांगितले जात आहे.
भारतात बॅटरीची निर्मिती
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या नव्या गाडीत जी बॅटरी असेल ती भारतात बनवलेली असेल. इलेक्ट्रिक कारसाठीची बॅटरी गुजरात राज्यात तयार केली जाणार आहे. टीडीएसजी या तेथील लिथियम आयन बॅटरी निर्मिती कंपनीकडून नव्या कारसाठीची बॅटरी विकसित केली जाणार आहे.
वैशिष्टय़े पाहुया
बॅटरी- 48 केडब्ल्यूएच किंवा 59 केडब्ल्यूएच
मायलेज- 400 ते 500 किलोमीटर अंतर
लांबी- 4.2 मीटरपेक्षा अधिक
ड्रायव्हिंग- टू व्हील ड्राईव्ह व फोर व्हील ड्राईव्ह पर्याय
कधी येणार बाजारात- 2025 पर्यंत
किंमत- 13 ते 15 लाख रुपयांपर्यंत