नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या मारुती सुझुकीने सीएनजीवर आधारीत बीएस-6 श्रेणीतील नवी सेलेरियो शुक्रवारी दिमाखात बाजारात दाखल केली आहे. या गाडीची सुरूवातीची किंमत 5.60 लाख रुपये इतकी असणार असून कंपनीने व्हीएक्सआय, व्हीएक्सआय (ओ) व टुर एचटु या प्रकारात आणखी तीन गाडय़ा सादर केल्या आहेत.
गेल्या दशकभरापासूनच कंपनी सीएनजी आधारीत मोटारी बाजारात दाखल करत आली आहे. यापूर्वी आल्टो, वेगनआर, इको, टुर एस, एर्टिगा, सुपर कॅरी अशा मोटारी सीएनजी पर्यायाच्या कंपनीने आणल्या आहेत. टिल्ट-स्टिअरिंग, हाइट-ऍडजस्टेबल सीटस्, सीडी प्लेयर व अलॉय व्हील्स ही काही वैशिष्ठय़े या गाडीत पाहायला मिळतील. मायलेजच्याबाबतीत कंपनीच्या गाडय़ा नेहमीच ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. पेट्रोलवर आधारीत सेलेरियो 23 किलोमीटर प्रति लिटर इतके मायलेज देते. नव्या गाडीचा ग्राऊंड क्लिअरन्स 165 मिमि. इतका आहे. पाच स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह नवी गाडी सादर होत आहे. कंपनीच्या आधी सीएनजीसह हायब्रिड मोटारीही दाखल झाल्या आहेत. मिशन ग्रीन मिलियनअंतर्गत सुझुकीने 10 लाख ग्रीन वाहनांची विक्री करण्यात यश मिळवले असून येणाऱया वर्षात आणखी 10 लाख ग्रीन वाहने विकण्याचा संकल्प कंपनीने केला आहे. अशा प्रकारच्या वाहनांमुळे इंधन आयातीवरचे ओझे काही प्रमाणात कमी करू शकणार आहेत. सरकारनेही यादृष्टीने सीएनजी पंपांचे जाळे विस्तारण्यावर भर देण्याचे निश्चित केलेले असल्याने याचा फायदा सीएनजी वाहनांच्या खरेदीवर होऊ शकणार आहे. मागच्या वर्षी सीएनजी पंप केंद्रांच्या संख्येत 56 टक्के इतकी वाढ झाल्याचेही समोर आले आहे. हे पाहता कंपनी सीएनजीवर आधारीत वाहनांच्या विक्रीवर जोर देणार आहे.