वार्ताहर /हिंडलगा
हिंडलगा येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा आघाडी शाखेच्यावतीने सोमवारी (दि. 20) सकाळी आंबेवाडी-मण्णूर क्रॉसवरील मार्कंडेय नदीकाठच्या बंधाऱयावरील विसर्जन स्थळाची श्रमदानाने साफसफाई करण्यात आली.
रविवारी अनंत चतुर्दशी दिवशी परिसरातील भाविकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून हिंडलगा पंपिंग स्टेशनजवळील बंधाऱयावर घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन केले. यावेळी आणलेले निर्माल्य व इतर प्लास्टीक कचरा तेथेच टाकून दिल्याने संपूर्ण परिसर गलिच्छ बनला होता. याकडे पहाटे फिरावयास गेलेल्या हिंडलगा येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा आघाडी शाखेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष गेल्याने त्वरित सर्वांनी श्रमदान करून संपूर्ण कचरा एका ठिकाणी जमा केला. त्यानंतर सर्व कचरा ट्रक्टर ट्रॉलीमध्ये भरून त्याची अन्यत्र विल्हेवाट लावण्यात आली. त्यामुळे नदीकाठचा परिसर पुन्हा स्वच्छ बनल्याने आंबेवाडी, मण्णूर व हिंडलगा ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य रामचंद्र कुदेमनीकर, सामाजिक कार्यकर्ते अनिल हेगडे, युवा आघाडीचे विनायक पावशे, संदीप मोरे, सतीश नाईक, रमाकांत पावशे, अर्जुन जकाने, प्रकाश कडोलकर यांच्यासह युवा आघाडी शाखेचे कार्यकर्ते उपस्थित होते.