जॉन लुईस गोलंदाजी प्रशिक्षक, जीतेन पटेलकडे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षणाची धुरा
लंडन / वृत्तसंस्था
इंग्लंडने माजी सलामीवीर मार्कस ट्रेस्कोथिकची राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी निवड केली असून जॉन लुईस गोलंदाज प्रशिक्षक तर न्यूझीलंडचा माजी फिरकीपटू जीतेन पटेल फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्त केले गेले आहेत. या सर्व निवडी कायमस्वरुपी असतील, अशी घोषणा सोमवारी केली गेली. याशिवाय, रिचर्ड डॉसन संघाचे इलाईट पाथवे कोच असतील. मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड यांच्याकडे मुख्य जबाबदारी कायम असणार आहे.
इंग्लंडचा क्रिकेट संघ सध्या भारत दौऱयावर असून 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत ते 1-2 फरकाने पिछाडीवर आहेत. इंग्लंडच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाची ट्रेस्कोथिक हे जोनाथन ट्रॉट यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील. आश्चर्य म्हणजे ट्रॉट यांनी अलीकडेच दक्षिण आफ्रिकन जॅक कॅलिसकडून हा पदभार स्वीकारला होता. कॅलिसनी इंग्लंडच्या लंका दौऱयात फलंदाजी प्रशिक्षकपदाचा कार्यभार हाताळला होता.
ईसीबीचे संचालक मो बॉबट यांनी मार्कस ट्रेस्कोथिक, जॉन लुईस व जीतेन पटेल यांच्या आंतरराष्ट्रीय अनुभवाचा संघाला उत्तम लाभ होईल, अशी आशा येथे व्यक्त केली. ट्रेस्कोथिकने 2000 ते 2016 या कालावधीत विविध क्रिकेट प्रकारातून 10 हजारपेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय धावा जमवल्या असून मार्चच्या मध्यात ते नवी जबाबदारी स्वीकारतील, असे संकेत आहेत. ट्रेस्कोथिक सध्या सॉमरसेटचे साहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे.
रिचर्ड डॉसन हे देखील ग्लॉसेस्टरशायरच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा देऊन इलाईट पाथवे प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारतील. विद्यमान यंग लायन्सचा मुख्य प्रशिक्षक व माजी ग्लॉसेस्टरशायर जलद गोलंदाज लुईसला जलद गोलंदाजी प्रशिक्षकपदी बढती मिळाली. माजी किवीज फिरकीपटू जीतेन पटेल सध्या सल्लागार म्हणून कार्यरत असून त्यांनी कायमस्वरुपी फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदाच्या पदावर रुजू होण्यास संमती दर्शवली. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱयांना राष्ट्रीय संघातील जबाबदारी सांभाळण्याबरोबरच स्थानिक क्रिकेटच्या माध्यमातून नवे गुणवान खेळाडू शोधण्याचीही सूचना केली गेली आहे.