पणजी बाजार व्यापारी संघटनेचे स्पष्टीकरण लोकांनी घाबरुन जाऊ नये
प्रतिनिधी / पणजी
गेल्या काही दिवसांमध्ये ज्या मार्केटसंदर्भात अफवा पसरविण्यात आल्या की येथील तावेर्न बारच्या मालकाला कोरोना झाला आहे, या गोष्टीत काहीही तथ्थ नसून यासंदर्भात त्या बार मालकाने स्वतःहून पोलीस तक्रार केली आहे. जी व्यक्ती सापडली आहे त्याने चुकीचा पत्ता दिल्यामुळे हा गोंधळ झाला आहे, असे स्पष्टिकरण पणजी बाजार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र धामस्कर यांनी केले आहे.
पणजी येथे पत्रकार परिषदेत राजेंद्र धामस्कर यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत संघटनेचे सचिव धमेंद्र भगत, उपाध्यक्ष मोहमद्द तजकत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे चिंबल येथील जी भाजीवाली मार्केट येथे भाजी विकत होती त्या महिलेची चाचणी झाली असून तिचा अहवाल देखील नकारात्मक आला आहे, अशी माहिती स्वतः महापौर व मार्केट चेअरमन यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मार्केटमध्ये अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नसल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे यावेळी संघटनतर्फे स्पष्ट केले आहे.
अशाप्रकारच्या काही घटना घडल्यास मार्केट संघटना स्वतःहून ग्राहक व व्यापाऱयांचे हित साधून मार्केट बंद ठेवतील. सध्या आम्ही पूर्ण काळजी घेऊनच मार्केट सुरु केले आहे. लोकांनी याची दखल घेऊन न घाबरता बाजारात खरेदीसाठी यावे, असे आवाहन संघटनतर्फे करण्यात आले आहे.
महापौरांनी विश्वासात घेतले नाही
महापौरांनी शुक्रवारी चार दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला तसेच त्वरित अर्धा दिवस मार्केट खुले करण्याचा निर्णय घेतला, परंतु हे सर्व करताना मार्केट संघटनेला विश्वास घेतले नाही. तसेच याबाबत त्यांना विचारले असता मार्केटमध्ये कोरोना रुग्ण सापडल्याचे कारण पुढे करत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले परंतु ही माहिती पूर्णपणे चुकीचे आहे, असे पणजी बाजार व्यापारी संघटनेचे मत आहे.