बेळगाव : महालक्ष्मीची आपल्यावर सैदव कृपा असावी आणि घरी सुख-समृद्धी नांदावी या हेतूने केल्या जाणाऱया मार्गशिर्षातील गुरुवारच्या लक्ष्मी पूजन व्रताला आजपासून सुरुवात होत आहे. मार्गशिर्षातील चार गुरुवारी महिला हे व्रत करतात.
या व्रतासाठी महिला दिवसभर उपवास करून सायंकाळी लक्ष्मीची प्रतिमा मांडून तिची विधिवत पूजा करतात. पूजेची जागा स्वच्छ करून चौरंग मांडून त्यावर नवीन वस्त्र घालून तांब्याचा कलश ठेवला जातो. त्यात दुर्वा, पैसा आणि सुपारी, अंब्याची डहाळी आणि पंचपत्री ठेवून पाठावर लक्ष्मीचा फोटो ठेवून पूजा केली जाते. या व्रतासाठी बाजारपेठेत फळांची आवक वाढली असून केळी, सफरचंद यासह महिलांनी फळांची खरेदी केली. तसेच लक्ष्मीचे मुखवटे खरेदी करण्यासही गर्दी
झाली.
मूर्तीपुढे पानाचा विडा, गूळ, घोबरे, खारीक बदाम, खडीसाखर व अन्य फळे मांडून पूजा आणि आरती केली जाते. महिला या दिवशी उपवास करून फक्त दूध आणि फळांचे सेवन करतात. शेवटच्या गुरुवारी सुहासिनींना बोलवून व्रताची सांगता केली जाते.